उसन्या पैशासाठी, कॉलेजच्या विद्यार्थ्यावर दगडहल्ला!
By गौरी टेंबकर | Updated: April 12, 2024 17:30 IST2024-04-12T17:27:50+5:302024-04-12T17:30:00+5:30
सांताक्रुज पूर्व परिसरात यश तुशामद (२०) नामक बीएएमसीच्या विद्यार्थ्याला उसने दिलेल्या पैशाच्या वादावरून मित्रानेच दगडाने मारहाण केली.

उसन्या पैशासाठी, कॉलेजच्या विद्यार्थ्यावर दगडहल्ला!
गौरी टेंबकर, मुंबई: सांताक्रुज पूर्व परिसरात यश तुशामद (२०) नामक बीएएमसीच्या विद्यार्थ्याला उसने दिलेल्या पैशाच्या वादावरून मित्रानेच दगडाने मारहाण केली. याप्रकरणी त्याने वाकोला पोलिसात तक्रार दिल्यावर अभिषेक मोगरकर नामक व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश हा विलेपार्ले येथील एका नामांकित कॉलेजमध्ये बीएएमसीच्या प्रथम वर्षात शिकत आहे. त्याच्या तक्रारीनुसार ९ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्याचा मित्र मोगरकर हा घरी आला आणि त्याने यशला उसने दिलेले पैसे मागितले. मात्र यशकडे पैसे नसल्याने मी तुझे पैसे काही दिवसांनी देतो असे तो म्हणाला. मात्र मोगरकरने आत्ताच पैसे पाहिजे असे म्हणत यशला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर घराच्या बाहेर गेल्यावर मोगरकरने यशच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. तसेच त्याच्या छातीवरही हाताबुक्याने मारत त्याला जमिनीवर ढकलून पळून गेला. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत यशला सायन रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार केल्यानंतर त्याने वाकोला पोलिसात जाऊन मोगरकर विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३२४,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.