Join us

जन्माला येण्यापूर्वीच सौदा; सहा दिवसांचे अर्भक साडेपाच लाख रुपयांना, विक्रीचा डाव उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:17 IST

याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

मुंबई : गोवंडीत बाळाच्या जन्मापूर्वीच सौदा झाला. पुढे, मुलगा जन्माला आला म्हणून त्याचा भाव वाढवत सहा दिवसांच्या बाळाची साडेपाच लाखांत विक्रीचा डाव पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

२९ वर्षीय तक्रारदार यांना शिवाजी नगर परिसरात समीर नावाची व्यक्ती लहान बालकांची विक्री करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार तक्रारदार यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधून भेट घेतली. समीरने एका महिन्यानंतर एका महिलेची प्रसूती होणार असून ही महिला चार लाख रुपयांना तिचे बाळ विकणार असल्याचे सांगितले. या व्यवहारासाठी समीरने आगाऊ रक्कम म्हणून ५० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने १० हजार रुपये  दिले. त्यानंतर ते सतत समीरच्या संपर्कात होते. दि. ६ ऑगस्टला समीरने कॉल करून मुलगा जन्माला आला आहे.  

पोलिसांनी रचला सापळा यासाठी साडेपाच लाख रुपये  द्यावे लागतील आणि त्याचा आजच व्यवहार करावा लागेल, असे सांगितले.तक्रारदाराने याबाबत पोलिसांना माहिती दिली. ठरल्याप्रमाणे बाळाचा सौदा होण्यापूर्वीच शिवाजी नगर पोलिसांनी लोटस जंक्शन शिवाजीनगर येथे सापळा रचला.  

लोटस जंक्शनवर काय घडले?दोन महिला एक बाळ घेऊन लोटस जंक्शनवर पोहोचल्या. तेथे महिलांनी बाळाची कागदपत्रे दाखवत बाळ देत साडेपाच लाखांची मागणी केली. 

त्यानुसार पोलिसांनी गोवंडीतील नाजिमा अस्लम शेख ऊर्फ नसरीन (३५) आणि तिच्यासोबत आलेल्या फातिमा मेहमुदअली शेख या दोघींना ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत नसरीन हिने हे बाळ तिच्या ओळखीच्या सुमया खान हिचे असून समीर ऊर्फ नबील शेख याने विक्रीसाठी दिल्याचे सांगितले.

बाळाच्या विक्रीतून येणारी रक्कम बाळाच्या आई-वडील, आरोपी समीर व त्याचे साथीदार आणि नसरीन हे आपसात वाटप करून घेणार होते. नसरीन हिने यापूर्वीदेखील बालकाची विक्री केली असून तिच्याविरुद्ध गोवंडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस