बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला आता वाहतूककोंडीचे विघ्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:06 IST2025-08-05T13:05:49+5:302025-08-05T13:06:28+5:30
प्रमुख मार्गांवर योग्य नियोजन करण्यासाठी पोलिसांना गणेशोत्सव समन्वय समितीचे साकडे

बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला आता वाहतूककोंडीचे विघ्न!
मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेश विसर्जन काळात ज्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन केले जाते, तसेच नियोजन बाप्पाच्या आगमन प्रसंगीदेखील करावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पोलिस आयुक्तांकडे केली आहे. गिरगाव चौपाटी आणि दादर चौपाटीवर जाणारा प्रमुख मार्ग विसर्जन मिरवणुकीसाठी मोकळा ठेवणे आवश्यक आहे, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.
सध्या जास्तीत जास्त सार्वजनिक मंडळांकडून श्रींच्या मूर्ती शनिवारी आणि रविवारी अशा सुटीच्या दिवशी मंडपात आणल्या जातात. या दृष्टीने काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत भोईवाडा आणि काळाचौकी पोलिस ठाणे, वाहतूक विभाग आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोस्तव समन्वय समिती व परिसरातील इतर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक झाली.
‘नो पार्किंग’ व्यवस्था करावी!
अनेक मंडळांनी गणेशमूर्ती कारखान्यांमधून मंडपाच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली असून, या मिरवणुकांमुळे दादर-लालबाग परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. अशा मार्गांवर वाहतूक एकेरी केल्यास किंवा दुसरे पर्यायी मार्ग न ठेवल्यास वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे.
वाहतूक पोलिसांनी प्रमुख गणेश मूर्तींच्या आगमनासाठी विशेष नियोजन करावे आणि या मार्गांवर आवश्यक तेथे ‘नो पार्किंग’ व्यवस्था करावी. या नियोजनामुळे खासगी वाहनचालकांबरोबरच गणेशभक्तांचा त्रासही कमी होईल, असे समितीने स्पष्ट केले आहे.
९९३ मूर्तिकारांना पालिकेने मंडपासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली आहे. मिरवणूक मार्गातील झाडांच्या फांद्या व सिग्नलच्या अडथळ्यांवर उपाययोजना करण्यात येत आहेत.