डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:33 IST2025-11-13T10:33:01+5:302025-11-13T12:33:32+5:30
याआधीही छठपूजेनिमित्त जमलेल्या लोकांसमोर भाषण करताना उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जहरी टीका केली होती

डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचलं
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मराठी आणि अमराठी वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत. उत्तर भारतीय सेनेकडून सातत्याने मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसवणार असल्याची विधाने केली जात आहेत. त्याशिवाय मुंबईत ३५ टक्के उत्तर भारतीय आहे, मराठी ५ पक्षात विभागलेत असं सांगत आपण मुंबईवर सत्ता आणू शकतो असा दावा सुनील शुक्ला यांच्याकडून केला जात आहे. त्यातच आता उत्तर भारतीय सेनेकडून मुंबईतील विविध भागात बटोगे तो पिटोगे असे बॅनर झळकावून वातावरण निर्मिती केली जात आहे.
मागील आठवड्यात अंधेरी, वांद्रे भागात बॅनर लावल्यानंतर आता उत्तर भारतीय विकास सेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचण्याचा प्रकार केला आहे. राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर उत्तर भारतीय विकास सेनेने बॅनर झळकावला आहे. त्यात बटोगे तो पिटोगे असं सांगत उत्तर भारतीयांना एकत्र येण्याचं आवाहन केले आहे. राज ठाकरे यांच्या घराबाहेर हा बॅनर लावल्यानंतर उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी फेसबुकवर पोस्ट करत राज ठाकरेंना आव्हान देणारी भाषा वापरली आहे. शुक्ला यांनी डरानेवालो को डराओ असं म्हणत मनसेला आव्हान दिले आहे.
मनसे कार्यालयात घुसून मारण्याचं केले होते आव्हान
याआधीही छठपूजेनिमित्त जमलेल्या लोकांसमोर भाषण करताना उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जहरी टीका केली होती. आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, जो सन्मान इथल्या लोकांना मिळतो तोच आम्हाला मिळायला हवा असं सांगत ईट का जबाब लोहे से देंगे असं विधान केले होते. त्याशिवाय आमच्या महिलांना कार्यालयात आणून त्यांना थप्पड मारली जाते. या लोकांच्या कार्यालयात घुसून एखादा उत्तर भारतीय जेव्हा त्यांना मारेल तर हा सुनील शुक्ला त्याच्यासोबत उभा राहील. त्याला संरक्षण आम्ही देऊ. १२८ वकील आमच्या पार्टीत आहेत असं चिथावणी देणारे विधानही सुनील शुक्ला यांनी केले होते.
मराठी बंटेगा, उत्तर भारतीय-गुजराती जुडेगा
दरम्यान, मराठी माणसे येत्या निवडणुकीत ५ पक्षात विभागली जातील. उत्तर भारतीय जो इथं पीडित आहे, आमचे शोषण होत आहे. आम्हाला दोन वेळचे जेवण मिळालं नाही तरी चालेल, भ्रष्टाचाराशी काही देणे घेणे नाही. रस्ते खराब असले तरी फरक नाही. परंतु आमच्या अस्मितेवर, मातेवर जर कुणी हात उचलत असेल तर त्याविरोधात आम्ही एकवटू त्यानंतर सत्तेत कुणी असेल ते पाहू. उत्तर भारतीयांचा महापौर मुंबईत बसवू. गुजराती समाज आणि आपण एकत्र आलो तर ५० टक्क्याहून जास्त होतो. त्यानंतर आपला महापौर इथे बसू शकतो असंही सुनील शुक्ला यांनी म्हटलं होते.