भामट्यांना बँक खाते पुरविणारा जाळ्यात; संशयित खात्याविरुद्ध भारतात १०६ गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 07:34 IST2025-07-29T07:34:14+5:302025-07-29T07:34:14+5:30
तो ठाण्याच्या कशेळी येथील रहिवासी आहे.

भामट्यांना बँक खाते पुरविणारा जाळ्यात; संशयित खात्याविरुद्ध भारतात १०६ गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीला बँक खाते पुरविणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी (उत्तर विभाग) अटक केली आहे. आरोपीच्या बँक खात्याविरुद्ध भारतातील विविध राज्यांत १०६ गुन्हे नोंद आहे. विनायक प्रमोदकुमार बरनवाल (वय २८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो ठाण्याच्या कशेळी येथील रहिवासी आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जूनला दहिसर येथे राहणाऱ्या ५८ वर्षीय तक्रारदार यांना शेअर ट्रेडिंगद्वारे जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखवीत जाळ्यात ओढले. गुंतवणुकीबरोबर वेगवेगळी कारणे देत २७ लाख ४४ हजार २३६ रुपये उकळले. अखेर फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवीत तपास सुरू केला.
तपासात ३ जूनला तक्रारदाराने आरोपीच्या सांगण्यावरून पहिल्या स्तरावरील बेनिफिशरी बँक खात्यात चार लाख रुपये जमा केले. यापैकी २ लाख ३० हजार रुपये सायबर भामट्यांनी तत्काळ दुसऱ्या स्तरावरील बँक खात्यात वळते केले. या बँक खातेदाराचा शोध घेतला असता, खाते हे आरोपीने गुन्ह्यातील रक्कम स्वीकारण्यासाठी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने विनायकला ठाण्यातून अटक केली. त्याच्याकडून मोबाइलदेखील हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेल्या बँक खात्याविरुद्ध विविध राज्यांत १०६ फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पोलिसांचे आवाहन
अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियाद्वारे संपर्क करून शेअर ट्रेडिंगमध्ये झटपट भरघोस नफा देण्याच्या आमिषाला बळी पडू नका. आपले बँक खाते दुसऱ्याला वापरण्यास देऊ नका. तसेच फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास मदतीसाठी तत्काळ सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.