बांगलादेशी घुसखोर मुंबईत ३४ वर्षे राहिला! लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 06:12 IST2024-12-25T06:12:12+5:302024-12-25T06:12:21+5:30
मुलगा परदेशात, तर पत्नी बांगलादेशात

बांगलादेशी घुसखोर मुंबईत ३४ वर्षे राहिला! लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदान
मुंबई : कफपरेड पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांवर केलेल्या कारवाईत मोईन हयात बादशाह शेख (५१) याला अटक केली आहे. तो घुसखोरीच्या मार्गाने भारतात येऊन मुंबईत ३४ वर्षे वास्तव्यास होता. बनावट कागदपत्रांद्वारे बनविलेल्या मतदान ओळखपत्राचा वापर करून त्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे.
पोलिसांनी मोईनजवळून एका मोबाइलसह आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र आणि वाहन चालक परवाना जप्त करत अधिक तपास सुरू केला आहे. कफ परेड पोलिसांनी आंबेडकरनगर परिसरातून अटक केलेल्या मोईन याने १९९० मध्ये बांगलादेशातून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करत मुंबई गाठली. बांगलादेशातील चित्तागांग येथील रहिवासी असलेला मोईन हा अवघा १७ वर्षांचा असताना अवैधरीत्या भारतात आला होता.
मुंबईतील घाटकोपर, परळ, कुर्ला, गोवंडी आणि ठाण्यातील मुंब्रा येथे वास्तव्यास राहून मोहित हा मुलांना उर्दू आणि कुराण शिकवत होता. सध्या तो कफ परेड येथे राहत होता. कफ परेडमध्ये तो बड्या हॉटेलमध्ये मौलाना म्हणून परदेशातून येणाऱ्या मुस्लीम समाजातील व्यक्तींसोबत नमाज पठणामध्ये सहभागी होत होता. मुंबईत त्याने बनावट कागदपत्रे तयार केली. याच कागदपत्रांच्या मदतीने मतदानदेखील केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी त्याच्याकडे पोलिस कसून चौकशी करत आहे.
मुलगा परदेशात, तर पत्नी बांगलादेशात
पोलिसांनी मोईनच्या जप्त केलेल्या मोबाइलमधून सर्व तपशील मिळवला आहे. मोईनची पत्नी बांगलादेशात असून, त्याचा मुलगा परदेशात शिकण्यासाठी आहे. तो मुलांना आणि पत्नीला मुंबईतून बांगलादेशी चलनात पैसे पाठवायचा. मोईनने २०२१ मध्ये बांगलादेशला भेट दिली होती. तो कोलकाता येथून सीमेपलीकडे चित्तागांगला जाण्यासाठी एजंटांना पैसे देत असल्याचे तपासात समोर आले आहे.