वांद्रे-वर्सोवा सी-लिंकच्या समुद्रातील कामांना गती; काम पूर्ण होण्यास मे २०२८ उजाडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 06:41 IST2025-10-26T06:41:00+5:302025-10-26T06:41:21+5:30
पश्चिम उपनगरातील कोंडी सोडविण्यास होणार मदत

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकच्या समुद्रातील कामांना गती; काम पूर्ण होण्यास मे २०२८ उजाडणार
मुंबई : वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्पाच्या कामांना पावसाळ्यानंतर गती मिळाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आता वर्सोवा, जुहू, कार्टर रोड आणि वांद्रे या चारही दिशांनी समुद्रातील कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाच्या कामाने आता गती पकडली आहे.
एमएसआरडीसीने १७.७ कि.मी. लांबीच्या सी लिंकच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार सागरी मार्गावर आठ मार्गिका बांधल्या जाणार आहेत. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० कि.मी. लांबीचा असून, तो समुद्रात ९०० मीटर आतमध्ये उभारला जाणार आहे. आता समुद्रात रस्ता उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. पावसाळ्यात समुद्रातील काम थांबविण्यात आले होते. मात्र त्याच वेळी वर्सोवा, कार्टर रोड आणि जुहू बाजूच्या कनेक्टरचे जमिनीवरील काम सुरू होते. आता अवजड साहित्य समुद्रात उतरविण्याचे काम एमएसआरडीसीने सुरू केले आहे. सद्यःस्थितीत या प्रकल्पाचे २५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा प्रकल्प पूर्ण मे २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास मे २०२८ उजाडणार
या प्रकल्पाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी ऑगस्ट २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोनामुळे लागू झालेली टाळेबंदी आणि कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडल्याने या प्रकल्पाचे काम रखडले होते. आता सर्व अडथळे दूर झाले असून कामांनी गती पकडली आहे. मात्र या प्रकल्पाला विलंब झाल्याने आता कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्प पूर्णत्वास आता मे २०२८ उजाडणार आहे.
वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्पावर दृष्टिक्षेप
९.६० कि.मी. सी लिंकच्या मुख्य सेतूची लांबी
१७.७कि.मी. प्रकल्पाची एकूण लांबी
१८,१२० कोटी रु. प्रकल्पाचा खर्च