केळीचे भाव ६० रुपये प्रति डझन, शेतकऱ्यांना मोठा फटका; वाहतूक, खत, मजुरीचा खर्चही निघेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:43 IST2025-09-30T11:40:29+5:302025-09-30T11:43:42+5:30
राज्याच्या विविध भागांमध्ये झालेली अतिवृष्टी आणि वाढलेली आवक, यामुळे केळीच्या दरांत मोठी घसरण झाली आहे.

केळीचे भाव ६० रुपये प्रति डझन, शेतकऱ्यांना मोठा फटका; वाहतूक, खत, मजुरीचा खर्चही निघेना
मुंबई : राज्याच्या विविध भागांमध्ये झालेली अतिवृष्टी आणि वाढलेली आवक, यामुळे केळीच्या दरांत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील बाजारपेठांमध्ये केळी ४० ते ६० रुपये प्रति डझन या दरांत मिळत आहेत. या दरांतील घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळत असला तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. मुंबईत दररोज हजारो क्विंटल केळीची आवक होते. मे महिन्यात २,१०० रुपये क्विंटलचा दर होता, तो आता काही बाजारपेठांत ७०० रुपयांखाली गडगडला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. प्रति क्विंटल केळीचे उत्पादन तसेच वाहतूक, मजुरी, खत, यावर सरासरी खर्च ९०० ते १,१०० रुपयांचा खर्च येतो. पण सध्या भाव ७०० पर्यंत घसरल्याने नुकसान होत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
सातत्याने होणाऱ्या पावसामुळे ट्रक वेळेवर बाजारपेठांत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे माल खराब झाल्याने फेकून द्यावा लागला, असे वाशी येथील एका घाऊक विक्रेत्याने सांगितले.
केळीची मागणी का घटली?
सणासुदीच्या काळात केळीची मागणी वाढते, पण यंदा महागाईमुळे ग्राहक फळांऐवजी इतर वस्तूंवर भर देत आहेत. शिवाय बाजारात सफरचंद, संत्री, डाळिंब यासारखी फळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे केळीच्या मागणीवर परिणाम झाला आहे.
मुंबईतील बाजारात सध्याचे दर (डझनप्रमाणे)
दादर : ५० ते ८० रुपये
कांदिवली : ४० ते ७० रुपये
वाशी: ४८ ते ८५ रुपये
माटुंगा : ५० ते ८० रुपये
चार महिन्यांच्या मेहनतीचे पीक सडून गेले. त्यामुळे सरकारने किमान हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सुनील यादव, फळविक्रेते
सध्या माल भरपूर, पण मागणी कमी आहे. सणासुदीत विक्री वाढली नाही. त्यामुळे दरही गडगडले.
अमित बनिया, फळविक्रेते