प्रदूषणकारी सहा काँक्रीट रेडीमिक्स प्लांटवर बंदी; घोडबंदरमधील कांदळवन, वनक्षेत्राला बसताेय धाेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:18 IST2025-10-11T09:18:46+5:302025-10-11T09:18:59+5:30
घोडबंदर गावातील रस्त्यालगत आणि एका बाजूला कांदळवनात; तर दुसऱ्या बाजूला वन हद्दीत काँक्रीट रेडीमिक्स प्लांट गेल्या अनेक वर्षांपासून नियमांचे उल्लंघन करत सुरू होते.

प्रदूषणकारी सहा काँक्रीट रेडीमिक्स प्लांटवर बंदी; घोडबंदरमधील कांदळवन, वनक्षेत्राला बसताेय धाेका
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भाईंदरच्या घोडबंदर गाव मार्गावर कांदळवन आणि वनक्षेत्रादरम्यान गाव वस्तीजवळ चालणाऱ्या प्रदूषणकारी सहा रेडीमिक्स काँक्रीट प्लांटविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व सहा प्लांट बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रोजच्या प्रदूषणापासून दिलासा मिळणार आहे.
घोडबंदर गावातील रस्त्यालगत आणि एका बाजूला कांदळवनात; तर दुसऱ्या बाजूला वन हद्दीत काँक्रीट रेडीमिक्स प्लांट गेल्या अनेक वर्षांपासून नियमांचे उल्लंघन करत सुरू होते. प्लांटमधील घातक काँक्रीट लिक्विड हे थेट कांदळवनामध्ये सोडले जात होते. या प्लांटमधून वायू व ध्वनी प्रदूषण होऊन संपूर्ण परिसरात घातक सिमेंट धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. रहिवाशांच्या घरात या घातक सिमेंट धुळीचा थर रोज साचत आहे.
तपासणीत आढळल्या अनेक गंभीर त्रुटी
घोडबंदर गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना कारवाईसाठी दिल्या होत्या. त्यानंतर गेल्याच महिन्यात लाइम स्टोन, ग्रास सिमेंट्स, सोनम बिल्डर्स, हिरकॉन इन्फ्रा, राज ट्रान्सिट इन्फ्रा व जे. व्ही. आय. ॲडव्हान्स टेक्निकल या रेडीमिक्स प्लांटची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, अनेक गंभीर त्रुटी आढळल्या.
पाणी शिंपडण्याची सोय नसल्याचे उघड
अहवालानुसार, साठवण व कार्यक्षेत्रात पाणी शिंपडण्याची कोणतीही सोय नव्हती.
नियमानुसार ३० फूट उंच बॅरिकेटऐवजी फक्त १० फूट टिनची भिंत उभारली होती. ट्रान्झिट मिक्सर वाहनांसाठी टायर वॉशिंग सुविधा नव्हती.
...अन्यथा ठाेठावणार दंड
प्रदूषण मंडळाने कारवाई करत काँक्रीट मिक्सर प्लांट तत्काळ बंदीचा आदेश ८ ऑक्टोबरला दिला आहे.
प्लांटचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यास अदानी वीज कंपनी व संबंधित यांना निर्देश दिले आहेत.
आदेशाचे पालन न केल्यास पर्यावरणीय कायद्यांनुसार दंडात्मक कारवाईचा इशारा मंडळाने दिला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही. नागरिकांच्या तक्रारी आपण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे दिल्या
होत्या. त्यानंतर तपासणीत गंभीर त्रुटी उघडकीस आल्या व तत्काळ बंदीचा आदेश देण्यात आला. शहरातील सर्व प्रदूषण करणाऱ्या युनिट्सवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री