Join us  

राज्य सरकारला पाकिस्तानी शेतक-यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे? बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 8:39 PM

महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) ने पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे.

मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) ने पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतक-यांना वा-यावर सोडणा-या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतक-यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.यासंदर्भात बोलताना आ. थोरात म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) ने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशातून दोन हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी निविदा काढली आहे. इतरवेळी पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा हा भारतीय जनता पक्षाचा दुतोंडीपणा आहे. कांद्याचे भाव वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडतील, परंतु भाजपला शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता जास्त आहे. दिवाळीनंतर खरीप हंगामातील कांदा बाजारात येणार असताना पाकिस्तानातून आयात करण्याची गरजच काय? पाकिस्तानबद्दल कोणीही काही बोलले की लगेच त्याला पाकिस्तानसमर्थक ठरवून अगदी देशद्रोह्याचा शिक्का मारण्याचा एककलमी कार्यक्रम  भाजपा व त्यांच्या समर्थकांनी लावलेला आहे. नेहमी पाकिस्तानच्या नावाने ओरडणाऱ्या  भाजपाला पाकिस्तानचा कांदा कसा काय चालतो? यातून भाजपा कसले देशप्रेम सिद्ध करत आहे? असे प्रश्न उपस्थित केले. पाकिस्तानचा कांदा आणून आपल्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा भाजप सरकारचा हा प्रयत्न आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :कांदाशेतकरीमहाराष्ट्रआ. बाळासाहेब थोरात