व्यापारी सल्लाला जामीन नाकारला; १२ कोटींच्या दागिन्यांचे गैरव्यवहार प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:35 IST2025-10-25T09:34:35+5:302025-10-25T09:35:08+5:30
वडिलांनीच संबंध नाकारल्याने जामीन नाही

व्यापारी सल्लाला जामीन नाकारला; १२ कोटींच्या दागिन्यांचे गैरव्यवहार प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा गैरवापर आणि विश्वासघात केल्याचा आरोप असलेला व्यापारी बिरजू सल्ला याचा जामीन अर्ज नुकताच एका दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला. सल्ला फरार होणार होता. त्याला अटक करताना आर्थिक गुन्हे शाखेला (ईडी) अनेक अडचणी आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
बिरजूला त्याच्या वडिलांनी सोडून दिल्याची नोटीस वर्तमानपत्रात प्रकाशित केली होती, तर पत्नीने त्याला शोधण्यासाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला पत्र लिहिले होते. ईडीने या कागदपत्रांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. ‘या टप्प्यावर असे दिसते की आरोपीच्या कुटुंबीयांनाही त्याच्या वर्तनाबद्दल खात्री नाही. त्यावरून तो पळून जाण्याचा धोका अधिक आहे. जर त्याची जामिनावर सुटका केली, तर त्याचा ठावठिकाणा त्याचे कुटुंबीयही सांगू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
गुजरात उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये सल्लाला एका प्रकरणात निर्दोष सोडले. तर, ३० ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबई-दिल्ली जेट एअरवेजच्या विमानात धमकीची चिठ्ठी ठेवल्याबद्दल एनआयए न्यायालयाने त्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली.
दागिने घेऊन पैसे दिले नाहीत असा आरोप
आर्थिक गुन्हे शाखेने २ जुलै रोजी अहमदाबाद येथे सल्लाला अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार, एक ज्वेलर्सवाला असून, त्यांचे सल्ला आणि कुटुंबाशी जुने व्यावसायिक संबंध होते. सल्लाच्या मालकीच्या ताडदेव येथील मालमत्ता ज्वेलरीवाल्याने भाड्याने घेऊन तिथेच दागिने घडविण्यात येतात. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सल्ला याने ज्वेलरीवाल्याला त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीला प्राचीन आणि हस्तनिर्मित दागिन्यांची आवड असल्याचे सांगितले. त्याने १४ कोटी रुपयांचे दागिने घेतले. मात्र, पैसे दिले नाही, असा आरोप आहे.
सल्लाच्या वकिलाचा युक्तिवाद काय?
सल्लाच्या वकिलाने युक्तिवाद केला की, हे प्रकरण व्यावसायिक स्वरुपाचे आहे. फौजदारी स्वरूप देण्याऐवजी दिवाणी वाद म्हणून हाताळले पाहिजे. या प्रकरणातील सहआरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सल्ला गेले ९० दिवस कारागृहात आहे.
सरकारी वकिलांनी सल्लाच्या जामीन अर्जाला विरोध
तपास अधिकारी व सरकारी वकिलांनी सल्लाच्या जामीन अर्जाला विरोध केला. सल्लाला विक्रीसाठी असलेल्या दागिन्यांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याने तपासाला सहकार्य केले नाही. जर, त्याची जामिनावर सुटका केली तर तो त्याचा गैरफायदा घेईल, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.