६१ बळी घेणाऱ्या बाबू गेनू मार्केट इमारत दुर्घटनेत अभियंता दोषमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 06:38 IST2024-07-08T06:34:10+5:302024-07-08T06:38:23+5:30
पालिका प्लॅनिंग आणि डिझाईन विभागाशी संलग्न असलेला सहायक अभियंता मधुकर रेडेकर याला सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

६१ बळी घेणाऱ्या बाबू गेनू मार्केट इमारत दुर्घटनेत अभियंता दोषमुक्त
मुंबई : बाबू गेनू मार्केटमधील इमारत कोसळून ६१ जणांचा मृत्यू, तर ३१ जण गंभीर जखमी झाल्याची घटना २०१३ मध्ये घडली होती. याप्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या पालिका प्लॅनिंग आणि डिझाईन विभागाशी संलग्न असलेला सहायक अभियंता मधुकर रेडेकर याला सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.
डॉकयार्ड रोड येथे ग्राऊंड प्लस चार मजले असलेली इमारत २७ सप्टेंबर २०१३ रोजी कोसळली होती. त्यानंतर पालिकेचे अधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्या इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या अशोक कुमार मेहता या भाडेकरूने मंडप सजावटीची साधने, साहित्य साठवून ठेवण्यासाठी अनधिकृत फेरफार करून खांब, बीम आणि स्तंभांचे नुकसान केले होते. परिणामी इमारत कोसळली.
कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलिसांनी चव्हाण यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता, परंतु खटला चालवण्याची परवानगी नसल्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले.
बाबू गेनू मार्केटमधील दुर्घटना घडली त्यावेळी रेडेकर हे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते.
चव्हाणांना दोषमुक्त केल्यानंतर रेडेकरही न्यायालयात
या प्रकरणात रेडेकर यांच्यावर खटला चालवण्यास पोलिसांना परवानगी मिळाली नव्हती. कारण त्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. त्यामुळे न्यायालयाने रेडेकर यांनाही या खटल्यातून दोषमुक्त केले.