बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : ‘एसआयटी’ चौकशी याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:53 IST2025-11-12T09:52:09+5:302025-11-12T09:53:37+5:30
Baba Siddiqui murder case: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी करणारी याचिका बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन यांनी दाखल केली आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : ‘एसआयटी’ चौकशी याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश
मुंबई - माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी करणारी याचिका बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन यांनी दाखल केली आहे. त्यावर पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. शहझीन सिद्दीकी यांनी गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, पोलिसांनी खऱ्या आरोपींना अद्याप गजाआड केलेले नाही.
न्यायालय काय म्हणाले?
बाबा सिद्दीकी (वय ६६) यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री मुंबईतील बांद्रा परिसरात मुलगा झिशानच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. न्या. ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्त आणि तपास अधिकाऱ्यांना या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मंगळवारी दिले. पुढील सुनावणी ११ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवला आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने न्यायालयाने पुढील सुनावणीच्या वेळी तपासाची केस डायरी सादर करण्याचेही पोलिसांना निर्देश दिले. पोलिसांनी झिशान यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. मात्र, त्यांचा जबाब नोंदविला नाही, असे सिद्दीकी यांचे वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाला सांगितले.