आझाद मैदान परिसर पूर्ववत...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 10:43 IST2025-09-04T10:43:05+5:302025-09-04T10:43:41+5:30

आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आझाद मैदान आणि महानगरपालिका परिसरात कर्मचाऱ्यांनी २ सप्टेंबर रात्रीपासून ३ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत अविरतपणे स्वच्छता करून संपूर्ण परिसर पूर्ववत केला.

Azad Maidan area restored | आझाद मैदान परिसर पूर्ववत...!

आझाद मैदान परिसर पूर्ववत...!

मुंबई : मराठा आंदोलन सुरू असताना पालिकेकडून संपूर्ण आझाद मैदान व परिसरात २९ ऑगस्टपासून २ सप्टेंबरपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विविध संयंत्रे तसेच वाहनांचा वापर करत घनकचरा व्यवस्था विभागाने रस्ते स्वच्छ केले. या पाच दिवस केलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत ६ मोठे कॉम्पॅक्टर, लहान ६ कॉम्पॅक्टर, कचरा वहन गाडी, प्रत्येकी दोन सक्शन आणि जेटिंग संयंत्रे, १३ एससीव्ही, ५२ टँकर्स अशा ९६ वाहनांचा वापर दोन्ही सत्रांमध्ये करण्यात आला. आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आझाद मैदान आणि महानगरपालिका परिसरात कर्मचाऱ्यांनी २ सप्टेंबर रात्रीपासून ३ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत अविरतपणे स्वच्छता करून संपूर्ण परिसर पूर्ववत केला.

पहिल्या दिवसापासूनच आंदोलनकर्त्यांच्या सुविधेसाठी तीन ठिकाणी फिरती (मोबाइल) शौचालये उपलब्ध करून देण्यात आली होती. याशिवाय पाच दिवसांच्या कालावधीत एकूण ४५० फिरती (पोर्टेबल) शौचालये आंदोलनकर्त्यांच्या वापरासाठी पालिकेने उपलब्ध करून दिली होती. तसेच कचरा संकलनासाठी सुमारे ५०० किलो इतक्या थैल्या (डस्टबिन बॅग) देण्यात आल्या होत्या. आंदोलनकर्त्या बांधवांनीही या थैल्यांचा वापर करून कचरा संकलनासाठी सहकार्य केल्याचे पालिकेने नमूद केले.

कीटकनाशक व जंतुनाशक उपाययोजना
आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने जंतुनाशक १०० किलो भुकटी तसेच १,०५० किलो ब्लिचिंग भुकटी फवारणी करण्यात आली.
डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि कीटक नियंत्रणासाठी दोन्ही सत्रांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कीटक नाशक विभागाचा चमू कार्यरत होता.  

हजारो आंदोलकांनी घेतला वैद्यकीय सेवेचा लाभ
महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून आझाद मैदान परिसरात २४ तास वैद्यकीय कक्ष कार्यरत होता. या वैद्यकीय कक्षामध्ये २४ तास कार्यरत टीम्स उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. 

या टीम्सच्या माध्यमातून पाच दिवसात १० हजारांहून अधिक आंदोलनकर्त्यानी वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला. तसेच काही रुग्णांना वैद्यकीय गरजेच्या अनुषंगाने नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.

७.२ लाख लिटर पाणी फवारणीसाठी वापरले 
२९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ या पाच दिवसात एकूण १४.४ लाख लिटर पाणी रस्ते धुण्यासाठी वापरण्यात आले. यातील सर्वाधिक पाण्याचा वापर ए वॉर्डमध्ये झाला, जेथे आझाद मैदान आणि मोर्चा स्थळ आहे. या वॉर्डात एकूण ७.२ लाख लिटर पाणी फवारणीसाठी वापरले गेले.

Web Title: Azad Maidan area restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.