Avoid Waste of Water Mumbaikar Says BMC | मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; जुलैअखेर पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; जुलैअखेर पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

मुंबई - सध्या राज्यात म्हणावा तेवढा पावसाचा जोर नसल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तर मुंबईसारख्या शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाऊस न पडल्याने मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची पातळी खालावली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील राखीव साठय़ातून आता पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीपुरवठय़ाद्वारे मुंबईवासियांना जुलैअखेर सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असे आवाहन महापालिकेने केले आहे.  

यावर्षीचा पावसाळा मुंबईत व तलाव क्षेत्रांत अजुनही मोठ्या प्रमाणात सुरु झाला नसल्याने तलावात पाणीसाठा जमा होत नाही. महापालिकेने जरी जुलैअखेर पाणी पुरविण्याचे नियोजन केले असले तरी, मुंबईकर नागरिकांनी पाणी जपून वापरावे, तसेच साठविलेले पाणी टाकून न देता त्याचा इतर कामासाठी उपयोगासाठी वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने मुंबईवासियांना केले आहे

मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही. मुंबई महानगरास पाणीपुरवठा करणाऱ्या व ब्रिटिशकालीन सर्वाधिक मोठ्या भातसा धरणात मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी म्हणजे २३.१९ टक्के पाणीसाठा आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांना पाणी पुरवणाऱ्या बारवी धरणातही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अवघा १४.९० टक्के इतका साठा शिल्लक आहे. अन्यही धरणांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत कमी साठा शिल्लक असल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात येत्या आठ ते दहा दिवसांत धो धो पाऊस झाल्याखेरीज मुंबई व ठाणेकरांना दिलासा लाभणार नाही. अन्यथा मोठ्या कपातीला तोंड देण्याची पाळी येथील कोट्यवधी लोकांवर येणार आहे.

दरम्यान, मुंबई शहर, उपनगरात दिवसभर पावसाचे ढग दिसत असले तरी प्रत्यक्षात सकाळी पाऊस पडल्यानंतर दुपारी काहीकाळ ऊन पडत असल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईत पावसाचं आगमन झालं आहे अशी माहिती बुधवारी हवामान खात्याने दिली असली तरी मुंबईकरांना असणारी मोठ्या पावसाची अपेक्षा अद्याप तरी पूर्ण झाली नाही. 
 

Web Title: Avoid Waste of Water Mumbaikar Says BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.