Join us
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी टाळा, कोरोना पळवा; गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 18:10 IST

कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतच आहे. अशावेळी पुढील महिन्यातील गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुंबई शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सवांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

मुंबई : कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतच आहे. अशावेळी पुढील महिन्यातील गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुंबई शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सवांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. हे निर्णय घेतले जात असतानाच गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्ती विसर्जनासाठी समुद्र आणि तलाव येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी मैदाने, उद्याने आणि सोसायटी परिसरात कृत्रिम तलावांस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येथे कृत्रिम तलाव उभारले तर कोरोनाचा संसर्ग टाळता येईल आणि कोरोनाला दूर ठेवता येईल, असा आशावाद लोकप्रतिनिधींनी देखील व्यक्त केला आहे.मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी आपआपली गणेशमूर्ती छोटी ठेवण्याबाबत निर्णय घेत आहेत. लालबागच्या राजाबाबत तर सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आणि या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत पाऊले उचलण्यात येत असून, आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढल्या जाऊ नयेत, असे आवाहन केले जात आहे. चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेदेखील कोरोनाचा प्रसार वाढू नये या दृष्टीने या वर्षी फक्त दिड दिवसाचा गणेशोत्सव तसेच १५ फुटा ऐवजी १.५ फुटाची मुर्ती आणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  या वर्षी सर्व प्रकारच्या मिरवणुका व कार्यक्रम रद्द करीत असल्याचा निर्णय मंडळाचे मार्गदर्शक ईश्वर तायडे यांनी जाहिर केले आहे. शिवाय आता गणेश मूर्ती विसर्जनासाठी गृहनिर्माण सोसायटयांच्या परिसरात कृत्रिम तलावांची मागणी जोर धरत आहे. विसर्जनाचा विचार करता मुंबईत गिरगाव, दादर, जुहू आणि वर्सोवासह ८४ स्थळी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. शिवाय ३४ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे.बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीदेखील याबाबत सकारात्मक असून, आता मुंबई महापालिका, सरकार याबाबत काय पाऊले उचलते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खेळाचे मैदान, क्रिडांगणे, वाहतूक तळ, मोकळे भूखंड येथे कृत्रिम तलाव बांधून दिल्यास गर्दी कमी होईल, असे म्हणणे मांडले जात आहे. एम-पश्चिम विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे यांनी देखील प्रशासनाला पत्र लिहत याबाबतची मागणी केली आहे. गिरगाव, दादर येथे विसर्जनासाठी मोठी गर्दी होईल; हे लक्षात घेता सोसायटी परिसरात कृत्रिम तलाव उभारण्याबाबत विचार करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे. तलावाचे बांधकाम आणि निर्माल्य वाहून नेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, २००७ मध्ये कृत्रिम तलावांची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर होऊ लागला. मात्र तुलनेने अद्यापही कृत्रिम तलावांचा वापर पुरेसा झालेला नाही.......................................२०१८ साली कृत्रिम तलावात करण्यात आलेली सार्वजनिक, घरगुती गणपती आण गौरी मूर्तींची संख्यासार्वजनिक  - ८४३ गणेशमूर्तीघरगुती - ३२ हजार ९५१ गणेशमूर्ती, ७८२ गौरी मूर्तीएकूण मूर्ती - ३४ हजार ५८४

 

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई