डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 04:48 AM2020-01-03T04:48:58+5:302020-01-03T07:02:07+5:30

इंदू मिल येथील कामाचा घेतला आढावा, निधी कमी पडू न देण्याची दिली ग्वाही

Attempts to complete Babasaheb Ambedkar Memorial within two years: Deputy Chief Minister | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री

Next

मुंबई : मंत्रिमंडळामध्ये आवश्यक निर्णय घेऊन येत्या दोन वर्षांत इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. काहीही झाले तरी स्मारकाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दादरमधील इंदू मिल येथे भेट देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी गुरुवारी घेतला. डॉ.आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाचे स्मारक हे भव्यदिव्य, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल, त्याचा नेटकेपणा आणि पावित्र्य राखले जाईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यावर पहिल्याच दिवसापासून अजित पवार यांनी राज्यातील विविध विकासकामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकस्थळाला भेट दिली. या वेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांकडून त्यांनी स्मारकाची सद्यस्थिती आणि आराखड्यासंदर्भात माहिती घेतली. स्मारकाच्या कामातील बारकावेही समजून घेतले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचनाही केल्या.

इंदू मिलच्या स्मारकाच्या बांधकामाच्या ठिकाणी आम्ही पाहणी केली आहे. २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले होते. या स्मारकाचे काम पूर्ण होण्यास नेमक्या काय अडचणी आहेत, काम कुठपर्यंत आले आहे, एमएमआरडीएतर्फे काम कसे केले जात आहे, याबाबत आम्ही आढावा घेतल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. बहुतांश परवानग्या मिळाल्या असून, काहीच बाकी आहेत. राज्य सरकारच्या अखत्यारित या परवानग्या लवकरच मिळतील. नजीकच्या काळात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये स्मारक लवकर पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, हे स्मारक शेकडो वर्षांसाठी प्रेरणा देणारे असेल. प्रत्येकाला या स्मारकाला भेट द्यावी असे वाटले पाहिजे, म्हणूनच स्मारक भव्यदिव्य स्वरूपात उभारण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. या स्मारकाचे वास्तुविशारदाचे काम शशी प्रभू हे करत असून एमएमआरडीएमार्फत हे काम करण्यात येत आहे. शाहपूरजी पालनजी या कंपनीमार्फत बांधकाम करण्यात येत आहे. हे काम १४ एप्रिल २०२२पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या वेळी मंत्री नबाब मलिक, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, स्मारकाचे वास्तुविशारद तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘स्मारकाचा नेटकेपणा जपावा’
स्मारकाचे दरवाजे हे उंच असले पाहिजेत, स्मारकाचा नेटकेपणा जपला गेला पाहिजे, स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या पायांना चटके बसू नयेत याची काळजी घ्यावी, त्यासाठी आतापासूनच वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यावा. समुद्र्राच्या खाऱ्या हवेचा स्मारकावर दुष्परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा अनेक सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी केल्या.

एमएमआरडीए करणार अहवाल सादर
उपमुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशांचा आम्ही विचार करून एक सविस्तर अहवाल सादर करू, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी स्पष्ट केले. तसेच एमएमआरडीए राज्य सरकारच्या निर्देशांनुसार पुढील कार्यवाही करेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Attempts to complete Babasaheb Ambedkar Memorial within two years: Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.