Join us  

मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 5:21 PM

ज्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीत वाहन चालक, सुरक्षा रक्षक आणि आदित्यजी असतात. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आदित्य ठाकरेंना ओळखत नाही असा भाग नाही असं शिवसेनेने म्हटलं.

 मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यानिमित्त आता वादाला तोंड फुटलं आहे. देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिले नाही. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. अजित पवारांना भाषण न करू दिल्याने हा महाराष्ट्राचा तसेच पालकमंत्री म्हणून पुणे जिल्ह्याचा अपमान आहे असं राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 

पुणे येथील कार्यक्रमावरून वाद सुरू असताना दुसरीकडे मुंबईत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाहनातून उतरवलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) केंद्रीय सुरक्षा यंत्रणांवर चांगलेच संतापल्याचं समोर आले. देहू येथील कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनातील गॅलरीचं उद्धाटन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. आयएनएन शिक्रा येथे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री म्हणून आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) पोहचले होते. परंतु त्याठिकाणाहून एकत्र निघताना केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला. 

शिवसेनेचं टीकास्त्रज्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीत वाहन चालक, सुरक्षा रक्षक आणि आदित्यजी असतात. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आदित्य ठाकरेंना ओळखत नाही असा भाग नाही. सुरक्षेचं कारण देऊन वारंवार महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केला.

अजितदादांना भाषण करू न दिल्याने वादंगदेहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पुकारले गेले. मात्र मोदींनी अजितदादांकडे इशारा करत त्यांचं भाषण का नाही? असा सवाल केला. मात्र यावरून राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांना भाषण करू न देणे दुर्दैवी आहे. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. कार्यक्रमात भाषणाची यादी केंद्रीय विभागाकडे पाठवली होती परंतु अजित पवारांचे नाव का वगळलं? कोत्या मनोवृत्तीची लोक राजकारणात आहेत हे वाईट आहे. पांडुरंगाचं नाव घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम वारी करतं. कुणी मोठं, छोटं नसतं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ते पक्षपात करतात हे खरोखर दुर्दैवी आहे असं त्यांनी टीका केली.  

टॅग्स :उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेनरेंद्र मोदी