निर्मलनगर पोलिसांच्या सायबर कर्मचाऱ्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:56 IST2025-10-28T12:55:57+5:302025-10-28T12:56:41+5:30
तीन महिलांसह चौघांनी केला जीवघेणा हल्ला

निर्मलनगर पोलिसांच्या सायबर कर्मचाऱ्यावर हल्ला
मुंबई : चोरीचा मोबाइल रिकव्हर करताना निर्मलनगर पोलिस ठाण्याचे सायबर विभागातील कर्मचारी समीर भिंगारदिवे (४०) यांच्यावर तीन महिलांसह चौघांनी जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी कविता पाटील, पूजा गायकवाड, गीता गोरवले आणि कल्पेश गायकवाड यांना अटक केली आहे.
भिंगारदिवे हे सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असून, सायबर गुन्ह्यातील आरोपी शोधणे आणि सीईआयआय पोर्टलच्या मदतीने चोरीचे मोबाइल शोधणे ही त्यांची जबाबदारी आहे. गेल्या सात दिवसांत त्यांना या पोर्टलमार्फत एक मोबाइल ट्रेस झाला होता. मोबाइलवरील सिम कार्ड क्रमांकाच्या आधारे त्यांनी संपर्क साधला असता, त्या मोबाइलचा वापर करणाऱ्याने आपले नाव वीरेंद्र कुमार सरोज असल्याचे सांगितले. भिंगारदिवे यांनी सरोज मोबाइल पोलिस ठाण्यात आणून देण्यास सांगितले. रिक्षाचालक असलेल्या सरोजने २५ ऑक्टोबर रोजी फोन घेऊन येत असल्याचे सांगून भिंगारदिवे यांना खार पूर्व येथील सर्विस रोडवर बोलावले. तेथे भिंगारदिवे चहाच्या टपरीवर सरोजची वाट पाहत असताना तो आला आणि रिक्षा पलीकडे उभी केली. फुटपाथवरील एका महिलेने सरोजला 'इथे येऊ नकोस,' असे सांगितले.
भिंगारदिवे यांनी, मी निर्मलनगर पोलिस ठाण्याचा अधिकारी आहे, फक्त थोडे बोलून आम्ही निघतो, असे सांगितले. मात्र, संबंधित महिलेने उद्धटपणे प्रतिसाद देत कोणालातरी फोन करून बोलावले.
भिंगारदिवे यांनी तिला, 'ऐकायचे नसेल तर पोलिस ठाण्यात चला, असे सांगत दुचाकीवर बसले. त्याचवेळी त्या महिलेच्या मदतीला दोन अनोळखी महिला आणि एक पुरुष आला. त्यांनी भिंगारदिवे यांना मारहाण केली. आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि गळ्यावर मारहाण केली. कल्पेशने कड्यानेही हल्ला केला.
गर्दी जमल्यावर महिलांपैकी ३ एकीने भिंगारदिवे यांना, 'माफी माग,' अशी धमकी दिली. त्याचवेळी पोलिस अंमलदार स्वप्निल तांबे आणि सतीश गीते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी भिंगारदिवे यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवून चौघांना अटक केली.