‘आठल्ये’नी आरे कॉलनीत फुलविले ‘नंदनवन’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 01:21 AM2019-09-12T01:21:22+5:302019-09-12T01:21:34+5:30

पर्यावरणप्रेमी संदीप आठल्ये यांनी यासंदर्भात सांगितले की, माझ्या बाबांनी २००० साली आरे कॉलनीमध्ये रस्त्यांलगत १०० झाडांची लागवड केली.

'Athalya' blossoms in our colony 'Paradise' | ‘आठल्ये’नी आरे कॉलनीत फुलविले ‘नंदनवन’

‘आठल्ये’नी आरे कॉलनीत फुलविले ‘नंदनवन’

Next

सागर नेवरेकर 

मुंबई : आरेमध्ये एकीकडे मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडली जात आहेत, तर आठल्ये कुटुंबीय आरेमध्ये झाडांची लागवड करून नंदनवन फुलवित आहेत. आठल्ये कुटुंबीय आणि मित्रपरिवारातर्फे आरे कॉलनीमध्ये विविध झाडांची लागवड सुरू आहे. आठल्ये कुटुंबीयांनी आरेमध्ये आतापर्यंत सुमारे १२०० ते १५०० झाडांची लागवड करून ‘आरे डेरी बटरफ्लॉय गार्डन’ उभारले आहे. या गार्डनमध्ये ६० ते ७० प्रजातींच्या फुलपाखरांचा अधिवास असून दिवसेंदिवस फुलपाखरांच्या संख्येत वाढ होत आहे.

पर्यावरणप्रेमी संदीप आठल्ये यांनी यासंदर्भात सांगितले की, माझ्या बाबांनी २००० साली आरे कॉलनीमध्ये रस्त्यांलगत १०० झाडांची लागवड केली. एक वर्ष चांगल्या रीतीने झाडांचे संगोपन करून ती जगविली. ही १०० झाडे जगल्यावर दुसऱ्या वर्षी पुन्हा १०० झाडे लावली गेली. त्यानंतर २००४ साली ‘पंचवटी नक्षत्र उद्याना’ची स्थापना करण्यात आली. यात आंबा, बेल, पारिजातक, वड, पिंपळ ही झाडे लावली. पंचवटी नक्षत्र उद्यानाचा परिसर हा साडेपाच एकरचा आहे. वडिलांनी हा परिसर खोदून त्यामध्ये विविध झाडे लावली. २०१५ साली बाबा सोडून गेले, तोपर्यंत त्यांनी साडेचार ते पाच हजार झाडे लावली आणि जगविली.

आरे कॉलनीमध्ये वडिलांच्या स्मरणार्थ ‘आरे डेरी बटरफ्लॉय गार्डन’ उभारण्यात आले. सध्या फुलपाखरू उद्यानामध्ये साधारण १२०० ते १५०० झाडे-झुडपे आहेत. कडीपत्ता, लिंबू, अल्मेंडा अशी औषधी व गुणकारी झाडे असून अलीकडे या झाडांची चोरी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. फुलपाखरू उद्यानामध्ये साधारण ६० ते ७० प्रजातींच्या फुलपाखरांचा अधिवास आहे. तसेच मान्सूनमध्ये ५०० ते १००० फुलपाखरे पाहता येतात. आरे कॉलनीमध्ये फुलपाखरांच्या संख्येत वाढ झाल्यापासून प्राण्यांमध्ये सरडा आणि विविध प्रजातींच्या पक्ष्यांची संख्याही वाढू लागली आहे, असे भाष्य आठल्ये यांनी केले.

Web Title: 'Athalya' blossoms in our colony 'Paradise'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Aarey Coloneyआरे