Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी एक पथदर्शक नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:09 AM2018-08-17T03:09:53+5:302018-08-17T03:10:31+5:30

जनसंघापासून राजकारणात सक्रिय असल्याने माझा अनेक नेत्यांशी संबंध आला. अटलजींशी अनेक वेळा भेटायचा, बोलायचा योग आला. अटलजी आम्हा जुन्या कार्यकर्त्यांचे आदर्श होते.

Atal Bihari Vajpayee : Atal Bihari Vajpayee is a guide leader | Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी एक पथदर्शक नेता

Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी एक पथदर्शक नेता

Next

- मुकुंद कुलकर्णी

जनसंघापासून राजकारणात सक्रिय असल्याने माझा अनेक नेत्यांशी संबंध आला. अटलजींशी अनेक वेळा भेटायचा, बोलायचा योग आला. अटलजी आम्हा जुन्या कार्यकर्त्यांचे आदर्श होते. अटलजींना पंतप्रधान झालेले पाहायचे हे दिवास्वप्न मनाशी बाळगून कामात झोकून दिले. पराजयाने खचलो नाही. अटलजींना पंतप्रधान झाल्याचे याची देही याची डोळा बघायला मिळाले आणि केलेल्या अथक परिश्रमाचे चीज झाले याचे समाधान वाटले. त्यांनी ज्या पद्धतीने अणू विस्फोट घडवून आणले व ज्या कणखरपणे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला केला हे कधीच विसरता येणार नाही.
अटलजींबरोबरचे दोन प्रसंग मी कधीच विसरणार नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती. बोरीवलीमध्ये ९ मार्च १९७३ रोजी त्यांची सभा सकाळी आयोजित करण्यात आली. मुंबईत प्रथमच अशी सभा आयोजित केली होती. त्यामुळे सभेच्या यशापयशाबद्दल बरीच चर्चा झाली. बोरीवली पश्चिमेतून डॉ. शृंगी तर पूर्वेस चिमणभाई मेहता उमेदवार होते. सभा बोरीवली स्टेशनसमोर झाली. अपेक्षेप्रमाणे सभेला प्रचंड गर्दी झाली. अटलजींचे प्रभावी भाषण झाले. आम्ही दोन्ही जागा नक्की जिंकू, असे मी अटलजींना सांगितले व जनसंघाच्या दोन्ही जागा प्रथमच बोरीवलीत निवडून आल्या. विशेष म्हणजे डॉ. शृंगी निवडून आले त्या मतदारसंघात बहुसंख्य मध्यमवर्गीय गुजराती मतदार होते व डॉ. शृंगी प्रचंड मतांनी निवडून आले. पूर्वेस चिमणभाई मेहता हे काँग्रेसच्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करणे अशक्य आहे असे मानले जात होते, त्या रमाकांत पाटील यांचा पराभव करून निवडून आले. या दोन्ही मतदारसंघांत अटलजींच्या सभेचा जनमानसावर प्रभाव पडला हे निश्चित.
दुसरा प्रसंग भाजपाच्या स्थापना अधिवेशनाचा. वांद्रे रेक्लेमेशनवर हे अधिवेशन झाले. माझ्याकडे कार्य समितीच्या बैठकीची व्यवस्था होती. डिसेंबर महिना असल्याने मुंबईत हॉल उपलब्ध नव्हते. रेक्लेमेशनवर कार्यकारिणी करायचा निर्णय झाला. तेथे मोठे टेक्स्टाइल मशिनरीचे प्रदर्शन भरले होते. मशिनरी हलवताच त्या रिकाम्या झालेल्या बॅरेक्समध्ये कार्यसमिती आयोजित करण्यात आली. आवश्यक ते बदल करून बैठक व निवास व्यवस्था त्या बरॅक्समध्ये केली. मोठी बरॅक होती. तेथे कार्यसमिती राष्ट्रीय परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली. बहुसंख्य प्रतिनिधी निवासाला बरॅकमध्ये राहिले.
अधिवेशनात कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनात अटलजींसह सर्व उपस्थित होते. संमेलनाला प्रचंड गर्दी झाली. अटलजींनी आपल्या कविता सादर केल्या व त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. कविसंमेलनात उपस्थित अन्य कवी अटलजींशी नम्रपणे वागत, बोलत होते. आपण एका महान कवीशी संवाद साधतो आहोत अशी भावना त्याच्या व्यवहारातून दिसत होती. अटलजी हे महान कवी आहेत याची जाणीव झाली.
अधिवेशनाच्या समारोपाला एम.सी. छागला यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. छागला हे स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. ते स्वत: राजकारणी नसले तरी अनेक राजकीय मुद्द्यांवर त्यांची मते स्पष्ट होती. आपल्या भाषणात एकूण राजकीय परिस्थितीचा ऊहापोह केल्यावर ते म्हणाले, या मंचावरून मी एक महत्त्वाची घोषणा करतो की माझ्या शेजारी विराजमान अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे भावी पंतप्रधान आहेत. छागलांचे भविष्य अचूक ठरले. छागलांच्या दूरदृष्टीची कदर केलीच पाहिजे. छागलांनी स्पष्टपणे सांगितले नसले तरी त्यांना अभिप्रेत अनेक गोष्टी अटलजींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात निश्चितच केल्या असतील. द्रष्टेपणा सांगतात तो हाच.
(लेखक हे पूर्व प्रदेश कार्यालय मंत्री आहेत.)

Web Title: Atal Bihari Vajpayee : Atal Bihari Vajpayee is a guide leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.