Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 08:49 IST2025-06-18T08:47:54+5:302025-06-18T08:49:27+5:30

Sumeet Sabharwals Final Farewell: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

At Captain Sumeet Sabharwal Final Farewell, A Grieving Father, Teary Hugs | Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमित यांचे वयोवृद्ध वडील पुष्कराज सभरवाल यांनी मुलाच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पार्थिवासमोर जोडून प्रार्थना केली आणि साश्रुनयनांनी मुलाला अखेरचा निरोप दिला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.

सभरवाल यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी अहमदाबाद येथून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर पवई येथील जल वायू विहार या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव काही काळ ठेवण्यात आले. अंधेरी चकाला येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वैमानिक, केबिन क्रू, सभरवाल यांचा मित्रपरिवार, स्थानिक नागरिक उपस्थित होते. जुहू कोळीवाडा येथील रहिवासी असलेल्या व केबिन क्रू साईनीता चक्रवर्ती यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ पश्चिम येथील स्मशानभूमीत सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

निवृत्ती घेणार होते
५६ वर्षीय कॅप्टन सभरवाल यांनी आपल्या वृद्ध वडिलांची काळजी घेण्यासाठी लवकरच आपण निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. कॅ. सभरवाल यांचे वडील 'डीजीसीए'मध्ये अधिकारी होते. सभरवाल हे एअर इंडियामध्ये वरिष्ठ वैमानिक होते. त्यांना ८,२०० तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता.

श्रद्धा धवन यांच्या पार्थिवावर हिरवी साडी आणि गजरा
एअर होस्टेस श्रद्धा धवन या मुलुंडच्या रहिवासी होत्या. त्यांचे पार्थिव सोमवारी रात्री मुलुंड येथे आणण्यात आले. रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर हिरवी साडी आणि गजरा अर्पण करण्यात आला होता. यावेळी त्यांची मुलगी, पती व नातेवाइक उपस्थित होते. श्रद्धा यांचे पती राजेश देखील एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत. अपघातावेळी ते दिल्लीत एका प्रशिक्षणासाठी गेले होते.

महाडिक यांच्यावर अंत्यसंस्कार
विमान अपघातात मृत्यू झालेल्या केबिन क्रू मेंबर अपर्णा महाडिक यांच्या पार्थिवावर मंगळवारी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव रात्री ९ वाजता गोरेगावातील घरी आणण्यात आणले. खा. सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आ. मिलिंद नार्वेकर आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

Web Title: At Captain Sumeet Sabharwal Final Farewell, A Grieving Father, Teary Hugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.