संघाला घटनेच्या चौकटीत बसविण्याचे आश्वासन द्या- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:28 IST2019-02-11T00:28:33+5:302019-02-11T00:28:46+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्य घटनेच्या चौकटीत बसविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय काँग्रेससोबत जाणार नसल्याचे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी स्पष्ट केले.

संघाला घटनेच्या चौकटीत बसविण्याचे आश्वासन द्या- प्रकाश आंबेडकर
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्य घटनेच्या चौकटीत बसविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय काँग्रेससोबत जाणार नसल्याचे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी स्पष्ट केले. संघावर बंदी आणण्याची आमची मागणी नाही. मात्र, सामाजिक अथवा राजकीय संघटना म्हणून त्यांची नोंदणी होणे आवश्यक असल्याचेही आंबेडकर म्हणाले.
या मुद्द्यावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहण्याची आमची तयारी असून, यावर आम्ही तडजोड करणार नाही. काँग्रेस याबाबत लेखी आश्वासन देण्यास तयार नसेल, तर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई, ठाणे, भिवंडी, रायगड, मावळ, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात वंचित आघाडी आपला उमेदवार देईल. आमच्या मागण्या मान्य केल्यानंतर आम्हाला किती जागा सोडायच्या, याचा निर्णय काँग्रेसने घ्यायचा आहे. चेंडू त्यांच्या कोर्टात असल्याचेही आंबेडकर म्हणाले.
२३ फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी पार्क येथे ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारने परवानगी दिल्यास तेथे सभाही घेऊ.
अघोषित आणीबाणी
देशात सध्या अघोषित आणीबाणी आहे. सरकारच संघाचा अजेंडा राबवित आहे. पश्चिम बंगालमध्येही तेच झाले. हुकूमशाही आणि फॅसिस्ट मनोवृत्तीमुळे हा प्रकार घडत आहे. याची लोकांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी अभिनेते अमोल पालेकरां-बाबत विचारले असता सांगितले.