एशियाटिक सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार; उद्या रंगणार लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:32 IST2025-11-07T13:31:51+5:302025-11-07T13:32:17+5:30

धर्मादाय आयुक्तांचा आदेश तांत्रिक कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाकडून अखेर रद्द

Asiatic Society refuses to postpone election process; fight to be held tomorrow | एशियाटिक सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार; उद्या रंगणार लढत

एशियाटिक सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार; उद्या रंगणार लढत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एशियाटिक सोसायटीच्या २७ सप्टेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत  अंतिम केलेली आणि ३ ऑक्टोबर रोजीपर्यंत पडताळणी झालेली मतदार यादीच निवडणुकीसाठी ग्राह्य धरावी, हा धर्मादाय आयुक्तांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने  तांत्रिक कारणास्तव रद्द केला. मात्र, न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला.

दि एशियाटिक सोसायटीची स्थापना १८०४  मध्ये म्हणजेच तब्बल २२१ वर्षांपूर्वी झाली आहे. तिच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, व्यवस्थापन समिती आणि छाननी समितीच्या सदस्यांसाठी ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे निवडणूक रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात माजी खासदार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आहेत. 

धर्मादाय उपायुक्तांच्या निर्णयाप्रमाणे ३ ऑक्टोबरपर्यंतचे सदस्य मतदानास पात्र ठरल्याने १ हजार ३३० सदस्य मतदान करू शकणार नाहीत. यावरून सोसायटीचे सदस्य रमेश भुतेकर यांनी  याचिका दाखल केली. सुनावणी न्या. रेवती मोहिते- डेरे व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुरू होती.

निवडणुकीच्या कारभारात हस्तक्षेपाचा अधिकार नाही

महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या कलम ४१ (ए) अंतर्गत धर्मादाय आयुक्तांना सोसायटीच्या निवडणुकीच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांचा निर्णय रद्द करण्यात यावा, तसेच १५ ऑक्टोबरपर्यंत ज्यांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे, त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा आणि निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकाकर्ते रमेश भुतेकर यांनी केली. निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती देण्यास नकार : धर्मादाय आयुक्तांना महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या कलम ४१ (ए) अंतर्गत  असा आदेश देता येत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने केवळ तांत्रिक कारणास्तव धर्मादाय आयुक्तांचा आदेश रद्द केला. मात्र, सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती देण्यास नकार दिला.

राष्ट्र प्रथम विरुद्ध एशियाटिक वाचवा, उद्या रंगणार निवडणूक

एशियाटिक सोसायटीच्या येत्या शनिवारी होणाऱ्या निवडणुकीत डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या पॅनलनी आता अजेंडा स्पष्ट केला असून, उजव्या विचारसरणीने ‘राष्ट्र प्रथम’चा नारा दिला आहे, तर डाव्यांतर्फे ‘एशियाटिक वाचवा’ अशी हाक दिली आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्यात अध्यक्षपदासाठी थेट लढत होणार आहे. त्यामुळे  लढतीमध्ये राजकीय रंग अधिक भरला. स्वाभाविकच दोन्ही विचारसरणीचे मुद्दे त्यांच्या अजेंडामध्ये डोकावत आहे. दरम्यान , कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा तसेच कथिक आर्थिक शिस्तीचा मुद्दा निवडणुकीत चर्चेत आहे.

अत्याधुनिकरणावर भर

  • उजव्या पॅनलने जे अपील जारी केले आहे त्यानुसार, एशियाटिकच्या वारशाच्या जतनाच्या पलीकडे जाऊन त्याच्या अत्याधुनिकीकरणावर भर देण्याची वेळ आली आहे. तसेच आजच्या डिजिटल युगात नव्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याचीदेखील गरज असल्याच्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे.
  • राष्ट्र प्रथम ही संकल्पना अग्रेसर ठेवत हे कार्य पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अपिलात नमूद करण्यात आले आहे. तर, डाव्या गटाने त्यांच्या अपिलात असे नमूद केले आहे की, सध्या जग हे अस्थिरतेच्या वातावरणातून जात आहे.
  • अशा परिस्थितीत बौद्धिकतेचा दोनशेपेक्षा अधिक वर्षांचा वारसा असलेली एशियाटिक सोसायटी अग्रगण्य स्थानी असणे गरजेचे आहे. 

Web Title : एशियाटिक सोसायटी चुनाव पर रोक लगाने से उच्च न्यायालय का इनकार; कल मुकाबला

Web Summary : बंबई उच्च न्यायालय ने मतदाता सूची पर धर्मादाय आयुक्त के आदेश को रद्द करने के बावजूद एशियाटिक सोसायटी के चुनाव पर रोक लगाने से इनकार कर दिया। भाजपा के विनय सहस्त्रबुद्धे का मुकाबला पत्रकार कुमार केतकर से अध्यक्ष पद के लिए है। 'राष्ट्र प्रथम' और 'एशियाटिक बचाओ' प्रमुख एजेंडे हैं। चुनाव निर्धारित कार्यक्रम के अनुसार होगा।

Web Title : High Court Refuses to Halt Asiatic Society Election; Battle Tomorrow

Web Summary : Bombay High Court declined to stay the Asiatic Society election despite nullifying charity commissioner's order on voter list. BJP's Vinay Sahasrabuddhe faces journalist Kumar Ketkar for president. 'Rashtra Pratham' and 'Save Asiatic' are key agendas. The election will proceed as scheduled.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.