मतदार यादीच्या निश्चितीनंतर ‘एशियाटिक’ची निवडणूक, प्रक्रियेसाठी १ महिन्याचा कालावधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 05:45 IST2026-03-26T05:44:00+5:302026-03-26T05:45:21+5:30
‘द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’ या संस्थेच्या सदस्यांची निवडणूक दीर्घकाळ प्रलंबित असल्याबाबत विधान परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता.

मतदार यादीच्या निश्चितीनंतर ‘एशियाटिक’ची निवडणूक, प्रक्रियेसाठी १ महिन्याचा कालावधी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’च्या निवडणूक प्रक्रियेबाबत फिट पर्सन व अन्य तीन जणांची उपसमिती नेमण्यात आली आहे. कायदेशीर व पात्र मतदारांची यादी दोन महिन्यांमध्ये तयार करून ती प्रसिद्ध करण्याचे निर्देश समितीला दिले आहेत. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती विधि व न्यायराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
आ. प्रसाद लाड यांनी ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’ या संस्थेच्या सदस्यांची निवडणूक दीर्घकाळ प्रलंबित असल्याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. निवडणूक जाहीर करून ती पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी शासन कोणती कार्यवाही करणार? असा सवाल त्यांनी केला.
प्रक्रियेसाठी १ महिन्याचा कालावधी
मतदार यादी तयार झाल्यावर ती प्रसिद्ध करणे. त्यावर आक्षेप असल्यास तो दाखल करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देणे. त्यापुढील १५ दिवसांत आक्षेप निकाली काढणे, अंतिम यादी तयार करणे या प्रक्रियेसाठी १ महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण केल्यानंतर लवकरात लवकर निवडणूक घेण्यात येईल, असे राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
नव्याने यादी तयार करणे सुरू
उत्तर देताना राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव व सदस्यांच्या निवडणुकीसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. विशेषतः मतदारयादी जाहीर न करणे, निवडणुकीपर्यंत सातत्याने नवीन नोंदणी सुरू ठेवणे या बाबींवर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यामुळे मतदार यादी नव्याने तयार करण्यात येत आहे.