आशियातील मोठे कारशेड मंडाळेत, मेट्रो २ बी मार्गिका, एकाच वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या राहणार, २९ किमी लांबीचा ट्रॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:14 IST2025-11-15T13:14:29+5:302025-11-15T13:14:46+5:30
Mumbai Metro: डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ बी मार्गिकेसाठी मंडाळे येथे एकाच वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करण्याच्या क्षमतेचे आणि २९ किमी लांबीचा अंतर्गत ट्रॅक असलेले कारशेड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) साकारले आहे.

आशियातील मोठे कारशेड मंडाळेत, मेट्रो २ बी मार्गिका, एकाच वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या राहणार, २९ किमी लांबीचा ट्रॅक
मुंबई - डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ बी मार्गिकेसाठी मंडाळे येथे एकाच वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करण्याच्या क्षमतेचे आणि २९ किमी लांबीचा अंतर्गत ट्रॅक असलेले कारशेड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) साकारले आहे. हे कारशेड आशियातील सर्वात मोठे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. लवकरच या कारशेडमधून मेट्रोचे संचलन सुरू होणार आहे.
'मेट्रो २ बी' मार्गिका २३.६ किलोमीटर लांबीची असून, त्यावर १९ स्थानके आहेत. या मार्गिकेसाठी १०,९८६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो मार्गिकेचे संचलन मंडाळे येथील ३०.४५ हेक्टर जागेवर उभारलेल्या कारशेडमधून होणार आहे. हे कारशेड तळमजला अधिक एक मजला अशा स्वरूपात उभारले आहे. गाड्या ये-जा करण्यासाठी ३ 'वाय' डक्ट उभारण्यात आले आहेत. तसेच, या कारशेडमध्येच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक केंद्र एमएमआरडीएने उभारले आहे.
एमएमआरडीएला उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना
बहुप्रतिक्षित डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ बी मार्गिकेचा मंडाळे ते चेंबूर मार्गाच्या उद्घाटनासाठी एमएमआरडीएला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. या मेट्रोची कामे पूर्ण होऊन जवळपास दीड महिना होत आले आहेत. त्याचबरोबर 'सीएमआरएस' प्रमाणपत्रही मिळाले आहे. तसेच, एमएमआरडीएने उद्घाटनाची तयारीही केली आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप वेळ मिळाली नसल्याने या मार्गाचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे.
