धक्कादायक! एशिया वर्ल्ड कपच्या क्रीडा समालोचकाची सोनसाखळी खेचली; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:55 IST2026-02-17T10:54:10+5:302026-02-17T10:55:32+5:30
संबंधित कंपनीचे कार्यालय गोरेगाव पश्चिमेतील बांगूरनगर लिंक रोड येथील माइंड स्पेस येथे १५ फेब्रुवारीला रात्री जेवणानंतर १० वाजण्याच्या सुमारास शतपावलीसाठी मोहनसुंदर बाहेर पडले.

धक्कादायक! एशिया वर्ल्ड कपच्या क्रीडा समालोचकाची सोनसाखळी खेचली; गुन्हा दाखल
मुंबई : एशिया वर्ल्ड कप स्पर्धेचे समालोचन करण्यासाठी मुंबईत आलेल्या तामिळनाडूतील क्रीडा समालोचकाची ६० हजार रुपयांची सोन्याची साखळी दुचाकीस्वारांनी खेचून पळ काढल्याची घटना गोरेगाव पश्चिमेत घडली. याप्रकरणी दोन अनोखळी व्यक्तींविरोधात १५ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी मुख्य शूटरसह ७ जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या १२ वर
तक्रारदार साई मोहनसुंदर (३०) मूळचे चेन्नईचे रहिवासी असून, ते क्रीडा समालोचक आहेत. एशिया वर्ल्ड कप (रायजिंग स्टार) स्पर्धेसाठी मुंबईतील सोनी कंपनीच्या कार्यालयात तामिळ भाषेत समालोचन करण्यासाठी ते आले आहेत. संबंधित कंपनीचे कार्यालय गोरेगाव पश्चिमेतील बांगूरनगर लिंक रोड येथील माइंड स्पेस येथे १५ फेब्रुवारीला रात्री जेवणानंतर १० वाजण्याच्या सुमारास शतपावलीसाठी मोहनसुंदर बाहेर पडले.
१५ ग्रॅम सोन्याची चेन, पेंडंटची किंमत ६० हजार रुपये
लिंक रोडवरून मोहनसुंदर हे एम. जी. रोडकडे जात असताना, मंथन हॉटेलच्या विरुद्ध बाजूस रात्री १०:३० ते ११ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या पाठीमागून आले.
मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने खेचून दोघेही भरधाव पसार झाले. सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व त्यात बालाजीचे पेंडंट असून तिची अंदाजे किंमत ६० हजार रुपये, असा ऐवज चोरीला गेला.
नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीचा वापर
संशयित दोघांचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून, त्यांनी काळ्या रंगाचे हुडी शर्ट परिधान केले होते. ते बजाज कंपनीच्या नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून आले होते, असे फिर्यादीने सांगितले. याप्रकरणी दोघांचा शोध सुरू आहे.