Join us  

अशोक चव्हाण 'भाजपा'ऐवजी चुकून 'काँग्रेस' म्हणाले; पाहा, देवेंद्र फडणवीसांनी काय केले?

By मुकेश चव्हाण | Published: February 13, 2024 1:59 PM

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला.

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज भारतीय जनता पार्टी (भाजपा)मध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार अमर राजुरकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. 

३८ वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करत आहे. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिलीय. गेल्या ३८ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय, असं अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले. तसेच राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करून. मी व्यक्तिगत टीका कुणावर करणार नाही. मी कुणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

अशोक चव्हाणांकडून 'भाजपा'ऐवजी 'काँग्रेस'चा उल्लेख

अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण यांच्याकडून अनवधानाने 'मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष' आशिष शेलार असा उल्लेख झाला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाण यांना रोखलं आणि 'काँग्रेस नाही भाजपाचे' असं सांगितले. त्यानंतर एकच हशा पिकला. पहिली पत्रकार परिषद भाजपा कार्यलयात असल्यामुळे असं झालं. आज पहिलाच दिवस आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. 

अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार?, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

भाजपाचे केंद्रीय नेते राज्यसभेचे उमेदवार ठरवितात. येत्या काही दिवसांत त्यांची यादी येईल तेव्हा तुम्हाला समजेल असे फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण यांना प्रशासकीय आणि राजकीय अनुभव आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल असे, फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण यांचा भाजपातील भुमिका काय असेल हे केंद्रीय भाजपा ठरवेल. त्यांची जी प्रतिमा आहे ती राष्ट्रीय स्तरावरील आहे. यामुळे केंद्रात निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले. एवढ्या वर्षांची पुण्याई सोडून हे लोक आमच्यासोबत का येतायत, कारण काँग्रेसला घर सांभाळता येत नाहीय. भाजपाला विरोध करता करता ते आता देशाच्या विकासाला विरोध करू लागले आहेत. यामुळे त्यांना नेते का सांभाळता येत नाहीत याचे आत्मचिंतन करावे, असे फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :अशोक चव्हाणदेवेंद्र फडणवीसकाँग्रेसभाजपामहाराष्ट्र