ठाकरे गटाकडून मुंबईकरांशी एक लाख कोटींची बेईमानी, आशिष शेलार यांचा थेट आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:43 IST2025-05-28T16:42:55+5:302025-05-28T16:43:23+5:30
Ashish Shelar News: गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे 1 लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे, असे आव्हान आशिष शेलार यांनी दिले.

ठाकरे गटाकडून मुंबईकरांशी एक लाख कोटींची बेईमानी, आशिष शेलार यांचा थेट आरोप
मुंबई - गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे 1 लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे. ही एक लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा थेट आरोप मुंबई उपनगर पालकमंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज येथे केला.
मुंबईत निर्माण आलेल्या पुर परिस्थितीबाबत आज आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालयात जाऊन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन अनेक सूचना तर केल्याच सोबत ब्रिमस्टोवँडसह मागील २० वर्षांच्या काळात मुंबईत खर्च झालेल्या एक लाख कोटीच्या कामांची श्वेतपत्रिका काढा, अशी आग्रही मागणी केली.
महापालिकेच्या २० वर्षांमधील ८० लाख कोटींच्या बजेटमधील ४० टक्के विकास कामे धरली तर त्यापैकी केवळ १० टक्के नाले, मिठी नदी, ब्रिमस्टोवँडला खर्च झाले, असे गृहित धरले तरी २० वर्षात मुंबईकरांचे एक लाख कोटी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी खर्च केले. त्याचा हिशेब त्यांनी मुंबईकरांना द्यावा, आणि मग मागच्या तीन वर्षांचा हिशेब आम्हाला विचारावा, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.
मान्सूनपूर्व कामे सुरू असतानाच मंत्री शेलार यांनी नालेसफाई, रस्ते बांधणीच्या कामांची पाहणी दौरा करून अनेक बाबी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या होत्या. तर उपनगर पालकमंत्री म्हणून आशिष शेलार यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ घेऊन थेट आयुक्तांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, कमलेश यादव, रिटा मकवाना, प्रकाश गंगाधरे, आशा मराठे, हर्षिता नार्वेकर, रोहिदास लोखंडे आदींचा समावेश होता.
आज बैठकीत आशिष शेलार आयुक्तांशी चर्चा करताना सांगितले की, ब्रिमस्टोवँडचा प्रकल्प आजपर्यंत का पूर्ण झाला नाही? त्यासाठी सन 2017 पर्यंत किती निधी खर्च झाला? तसेच २५ ते ५० मि मि पाऊस झाला तर ही यंत्रणा उभारण्यात येणार होती, तीही पूर्ण झाली नाही. यापेक्षा जास्त पाऊस झाला तर काय करणार? आता यापेक्षा जास्त पाऊस मुंबईत पडतोच त्यामुळे याबाबत काय करणार ? याचे उत्तर पालिका आयुक्तांनी द्यावे.
मिठी नदीचा गाळ किती काढला? तो कुठे टाकला? त्यासाठी किती निधी खर्च झाला? याची माहिती मुंबईकरांना द्या. कारण मिठी नदी ही भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून मृत व्यक्तीच्या नावे करार केले गेले, ज्या जागेत गाळ टाकला असे सांगितले जाते आहे त्या ग्रामपंचायत असे काही घडलेच नाही सांगत आहेत. त्यामुळे याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून जी चौकशी सुरु आहे त्यात हे सारे घोटाळे बाहेर येते आहे. मग पालिका काही मुंबईकरांना सांगणार आहे की नाही? मुंबईतील पाथमुखे ही भरती रेषेच्या खाली आहेत. त्यापैकी किती पाथमुखांची उंची वाढवून गेल्या २० वर्षात ती वर आणण्यात आली याची माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.