Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाच्या निकृष्ट कामांमुळे मुंबईकरांचे हाल, आशिष शेलारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 17:36 IST

Ashish Shelar : गेल्या एक दोन वर्षांच्या कामावर कालची परिस्थिती उद्भवली नाही तर गेल्या पंचवीस वर्षांतील निकृष्ठ दर्जाची कामे त्याला जबाबदार आहेत, असे म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

मुंबई : काल संध्याकाळी मुंबईत मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. परिणामी लोकल सेवा तसेच रस्ते वाहतुकी याचा फटका बसला. यावरून आता भाजपने शिवसेनेच्या ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेने मागील २५ वर्षात जी निकृष्ट दर्जाची कामे केली, त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत असून काल जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत, अशी भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी गुरुवारी मांडली. तसेच, संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार यांनी आज दादर वसंतस्मृती येथे पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. तसेच, संजय राऊत यांनी एका महिलेची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे महिलेची बदनामी करणाऱ्या या व्यक्तीला रश्मी ठाकरे यांनी सामनाच्या कार्यकारी संपादकपदी ठेवू नये. तसेच, संजय राऊत यांना राज्यसभेच्या सदस्यपदी राहण्याचा अधिकार आहे का? त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे आशिष शेलार म्हणाले. 

उबाठा सेनेने गेल्या पंचवीस वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असताना जी कामे केली, ती निकृष्ट दर्जाची आहेत. ब्रिमस्टोवॅड हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही. हजारो कोटी खर्च करुन पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ते उभी करु शकले नाहीत. गेल्या एक दोन वर्षांच्या कामावर कालची परिस्थिती उद्भवली नाही तर गेल्या पंचवीस वर्षांतील निकृष्ठ दर्जाची कामे त्याला जबाबदार आहेत, असे म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेमुंबई