Corona virus : मास्क लावण्यात लाज कसली?, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 09:49 AM2021-04-03T09:49:13+5:302021-04-03T09:50:11+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता टोला लगावला.

Ashamed to wear a mask, the Chief Minister uddhav thackeray slapped Raj Thackeray | Corona virus : मास्क लावण्यात लाज कसली?, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला टोला

Corona virus : मास्क लावण्यात लाज कसली?, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला टोला

Next
ठळक मुद्देलॉकडाऊन करु नका, असे म्हणणाऱ्या विरोधकांना आणि सल्ले देणाऱ्या उद्योजकांनाही मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून टोला लगावला आहे.

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही, तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच, सरकारवर टीका करणाऱ्यांचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. (Maharashtra Lockdown: Uddhav Thackeray slams Anand Mahindra on Lockdown, Corona Virus). मास्क न लावण्यात कसलं शौर्य?, असे म्हणत राज ठाकरेंना लक्ष्य केलं. 

लॉकडाऊन करु नका, असे म्हणणाऱ्या विरोधकांना आणि सल्ले देणाऱ्या उद्योजकांनाही मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून टोला लगावला आहे.  दोन दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी  राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे. तर, मास्क न वापरणाऱ्यांवरही जबरी प्रहार केलाय. 

नाव न घेता राज ठाकरेंना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता टोला लगावला. अनेकजणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणार नाही, मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मास्क घालण्यात लाज कसली, मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यानंतर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही बोलणार, आता तुम्हीही ऐका.. किंबहुना ऐकाच... असे म्हटलंय.  

संदीप देशपांडेचं ट्विट
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हची एकप्रकारे खिल्लीच उडवली आहे. ''मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका...किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह.'', असे ट्विट देशपांडे यांनी केलंय. म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत, त्यांनी 11 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं सूचवलं आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री
ब्राझील, फ्रान्स, बल्गेरिया, रशिया मधल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी देत तिथं लादण्यात आलेल्या कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत सांगून विरोधकांवर निशाणा साधला. "देशाबाहेर कोरोनाची स्थिती भयंकर होत चालली आहे. अनेक ठिकाणी आजही लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादलेले आहेत. पण, आपण राज्यातील जनतेचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन अद्याप तरी लॉकडाऊन केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी कोरोनाचं राजकारण करू नये. उलट त्यांनी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांसाठी मदत करण्याची भूमिका घ्यावी", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

लॉकडाऊन नको मग पर्याय सुचवा
"राज्यात आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत. आजच्या घडीला सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत आणि संख्या येत्याही काळात वाढवण्यात येणार आहे. पण आरोग्य सेवा वाढवा म्हणजे फक्त फर्निचर वाढवून चालत नाही. त्यासाठी लागणारे डॉक्टर, नर्सेस आणि तज्ज्ञ मंडळी कुठून आणणार?", असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. 

दोन दिवसांत कठोर नियमावली जाहीर करणार
मुख्यमंत्र्यांनी यावेळी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करत नसलो तरी इशारा देत आहे, असं सांगत येत्या दोन दिवसांत राज्यात नव्या निर्बंधांची नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तसेच अशीच रुग्णवाढ सुरू राहिली तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यातील उपलब्ध आरोग्य संसाधनं कमी पडू लागतील आणि कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा थेट निर्वाणीचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे
 

Read in English

Web Title: Ashamed to wear a mask, the Chief Minister uddhav thackeray slapped Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.