Deputy CM Eknath Shinde Vitthal Rukmini Puja: डाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सपत्नीक विठुरायाची पूजा केली, त्यावेळी ते बोलत होते.
वडाळा येथील विठ्ठल रखुमाईचे मंदिर हे १६ व्या शतकातील मंदिर असून ते प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. संत तुकारामांच्या हस्ते या देवळात विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. ज्या भाविकांना आषाढी वारीला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते इथे येऊन विठुरायाचे दर्शन घेतात. आषाढी वारीला पंढरपूर एवढाच उत्साह आणि गर्दी इथेही पहायला मिळते. या प्राचीन मंदिरात विठ्ठलाची पूजा करण्याचे सौभाग्य मिळाल्याबद्दल शिंदे यांनी यावेळी आनंद आणि समाधान व्यक्त केले.
राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडावा असे मागणे मागितले
मंदिरात अभिषेक आणि आरती केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील नागरिकांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद नांदावे, बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस यावे, राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडावा असे मागणे मागितल्यांचे सांगितले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, लाडक्या बहिणी लाडके भाऊ यांच्या आयुष्यातील दुःख, कष्ट दूर होऊन सुखाचे दिवस यावे हेच आमचे मागणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या मंदिराला २५ कोटींचा निधी दिला होता. त्यानुसार मंदिर समितीकडून विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून तो पूर्ण झाल्यानंतर या मंदिराचे सुशोभीकरण आणि अन्य कामांना प्रत्यक्ष सुरुवात होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या मंदिरासोबतच इथे अन्य देवांची देखील मंदिरे आहेत, त्यामुळे सर्व देवतांचे पावित्र्य राखून सुनियोजित असे काम इथे केले जाईल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, आमदार कालिदास कोळमकर, आमदार प्रसाद लाड,आमदार प्रा. मनीषा कायंदे,शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सह-मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, माजी नगरसेवक अमेय घोले आणि महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.