Join us
Daily Top 2Weekly Top 5

युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:01 IST

Raj Thackeray BJP: मनसे आणि उद्धवसेना यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले. मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने राज ठाकरेंवर पहिला हल्ला केला. 

Raj Thackeray BJP BMC Election: गेल्या काही महिन्यांपासून सगळ्यांचं लक्ष लागलेल्या राजकीय समीकरणावर अखेर निर्णय झाला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मनसे आणि उद्धवसेना यांची युती जाहीर केली. युती जाहीर होताच भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर मुंबई भाजपनेही एक पोस्ट करत राज ठाकरेंना डिवचले.

मुंबई महापालिका निवडणूक मनसे आणि उद्धवसेना एकत्र लढणार आहेत. दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी याबद्दलची भूमिका जाहीर केल्यानंतर भाजपने राज ठाकरेंविरोधात मोर्चा उघडला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी बघा रे हा व्हिडीओ असे म्हणत राज ठाकरे यांचा व्हिडीओ पोस्ट केला. 

"ज्या चार लोकांमुळे बाहेर पडले, त्याच..." 

अमित साटम यांच्यानंतर मुंबई भाजपच्या अकाऊंटवरूनही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. मुंबई भाजपने व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, "ज्या चार लोकांमुळे बाहेर पडले, आज त्याच ठिकाणी आलेल्या नवीन 'चार मामूं'च्या खान मानसिकतेच्या उबाठा गटाशी आघाडी केली. बघा रे हा व्हिडीओ", अशा शब्दात मुंबई भाजपने राज ठाकरेंना डिवचले. 

देवेंद्र फडणवीसांनीही डागले बाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनसे-उद्धवसेना युतीवरून टीकेचे बाण डागले. "दोन पक्षांनी अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली ही युती आहे. यामुळे फार काही परिणाम होणार नाही. मुंबईकरांचा या मंडळींनी सातत्याने विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबई बाहेर घालवण्याचे काम यांनी केले आहे."

"यांचा ट्रॅकरेकॉर्ड हा भ्रष्टाचार, स्वार्थीपणाचा आहे. आता जनता भावनिक बोलण्याला भूलणार नाही. त्यांनी आणखी दोन-चार लोक सोबत घेतले तरी मुंबईकर काम पाहून महायुतीच्या पाठीशी उभे राहतील. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही. मतांसाठी रोज मते बदलणारे आम्ही नाही. आम्ही कालही हिंदुत्ववादी होतो आणि उद्याही राहू", अशी टीका फडणवीसांनी राज ठाकरेंवर केली. 

टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६राज ठाकरेभाजपाराजकारणमनसे