Join us
Daily Top 2Weekly Top 5

जामिनावर सुटताच हात पकडला, जेलमध्ये गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:15 IST

याआधीही आरोपी मयूर खरात याने पीडितेचे लैंगिक शोषण केले. त्याप्रकरणी तो कारागृहात होता.

मुंबई :  अल्पवयीन मुलीच्या हाताला हिसका देऊन तिला आपल्याकडे ओढू पाहणाऱ्या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच १० हजार रुपये दंडही ठोठावला.

याआधीही आरोपी मयूर खरात याने पीडितेचे लैंगिक शोषण केले. त्याप्रकरणी तो कारागृहात होता. मात्र, जामिनावर सुटल्यावरही त्याने पीडितेचा विनयभंग केला. त्यामुळे विशेष पोक्सो न्यायालयाने मयूरला पाच वर्षे सक्त कारावासाची शिक्षा व १० हजार रुपये दंड ठोठावला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, १४ जुलै २०२१ रोजी पीडिता, तिची आई व भाऊ बाजारात जात होते. पीडितेची आई मोबाइलवर बोलत चालत होती. यादरम्यान, दोन्ही मुले मागेच राहिली. त्यावेळी अचानक मयूर दोन्ही मुलांच्या पाठीमागून आला आणि दोघांचे हात पकडले. पीडितेच्या भावाने आरोपीच्या हातातून कशीबशी सुटका करून घेतली आणि धावत आईजवळ आला. 

याचवेळी पीडितेनेही मयूरच्या हातातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मयूरने तिच्या हाताला हिसका देऊन स्वत:जवळ खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडिता त्याच्या हातातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकली. मुलगी जोरात ओरडल्यानंतर आरोपी मयूर तेथून पळाला. दुसऱ्या दिवशी मुलीच्या आईने मयूरविरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार केली आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटकही केली. मयूरने न्यायालयात त्याच्यावरील आरोप फेटाळले. आधीच्या गुन्ह्यात आपली जामिनावर सुटका झाली म्हणून तक्रारदाराने आपल्याविरोधात पोलिस ठाण्यात खोटी तक्रार केली, असे मयूरने न्यायालयाला सांगितले.

मात्र, न्यायालयाने त्याचा युक्तिवाद मान्य करण्यास नकार दिला. मयूरने अल्पवयीन मुलीचे आधीही लैंगिक शोषण केले. त्यामुळे तो बाजारात दिसताच तिने मयूरला ओळखले व आईला तेथून निघण्यास सांगितले. तिने दिलेल्या साक्षीवर शंका घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले. अल्पवयीन मुलीचा आरोपीने विनयभंग केल्याचे म्हणत न्यायालयाने मयूरला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस