उद्धव ठाकरेंना दिली तब्बल ४ हजार बनावट प्रतिज्ञापत्र; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 11:00 IST2022-10-09T10:59:57+5:302022-10-09T11:00:35+5:30
वांद्रेतील निर्मल नगर पोलिसांनी खोटी शपथपत्रे, बनावट आयकार्ड जवळपास ४ हजार ६८२ असा आकडा आहे. ही वेळ शिल्लक सेनेवर का आली? याचा विचार करायला पाहिजे असं शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंना दिली तब्बल ४ हजार बनावट प्रतिज्ञापत्र; नेमकं काय घडलं?
मुंबई - खरी शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहचला असता आयोगाने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरण्यास मनाई केली आहे. आयोगाने तात्पुरतं शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. हे ताजे असतानाच आता शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात बनावट स्टँम्पचा वापर केल्याचं समोर आले आहे.
मुंबई क्राईम ब्रांचने याबाबत मोठी कारवाई केली आहे. वांद्रे पोलिसांनी माहिम, वांद्रे परिसरात टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे हस्तगस्त केली आहेत. उद्धव ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त प्रतिज्ञापत्रे देण्याचं आवाहन शिवसैनिकांना केले होते. मात्र ठाकरेंना दिलेल्या प्रतिज्ञापत्रासाठी बनावट आयकार्डचा वापर करण्यात आला असा आरोप होत आहे.
शिल्लक सेनेवर एवढी वेळ का आली?
वांद्रेतील निर्मल नगर पोलिसांनी खोटी शपथपत्रे, बनावट आयकार्ड जवळपास ४ हजार ६८२ असा आकडा आहे. ही वेळ शिल्लक सेनेवर का आली? याचा विचार करायला पाहिजे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ही खोटी शपथपत्रे बनवण्यात आली असा आरोप शिंदे गटाने केला आहे. मला या गोष्टीची कीव वाटते. ज्या मेहनतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली. शेकडो शिवसैनिकांच्या रक्तातून, घामातून ही शिवसेना उभी केली. परंतु सत्तेच्या खुर्चीसाठी शिवसेनेची पत उद्धव ठाकरेंनी घालवली. निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रे सादर करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. हे सर्व मातोश्रीच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांकडून लिहून घेण्याची मोहीम सुरू केली होती.
काय होता शपथपत्रातील मजकूर?
‘माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वावर अढळ निष्ठा आहे. प्रतिज्ञापत्रात असेही नमूद आहे की, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. आणि या निष्ठेची पुनश्च: पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन, याची या प्रतिज्ञापत्राद्वारे ग्वाही देत आहे. प्रतिज्ञापत्रातील मजकूर सत्य आणि बरोबर आहे. त्यातील कोणतीही माहिती असत्य नाही. तसेच कोणतीही सत्यस्थिती लपविण्यात आलेली नाही.’