Aryan Khan Drugs Case: आर्यन खानच्या अडचणी पुन्हा वाढणार? जामिनाला सुप्रिम कोर्टात आव्हान दिले जाणार, एनसीबी आखतेय खास प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 16:54 IST2021-11-22T16:38:41+5:302021-11-22T16:54:32+5:30
Aryan Khan Drugs Case: मुंबई ड्रग्स केस प्रकरणामध्ये जामीन मिळालेला शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. माध्यमांमधून येत असलेल्या वृत्तांनुसार NCB आर्यन खानच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार करत आहे.

Aryan Khan Drugs Case: आर्यन खानच्या अडचणी पुन्हा वाढणार? जामिनाला सुप्रिम कोर्टात आव्हान दिले जाणार, एनसीबी आखतेय खास प्लॅन
मुंबई - मुंबई ड्रग्स केस प्रकरणामध्ये जामीन मिळालेला शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. माध्यमांमधून येत असलेल्या वृत्तांनुसार एनसीबी आर्यन खानच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार करत आहे. २८ ऑक्टोबर रोजी मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला जामीन दिला होता. २३ वर्षांच्या आर्यन खानला एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्यानंतर एक लाख रुपयांच्या दोन जामिनांवर आर्यन खानची मुक्तता झाली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांवर कायदेशीर सल्ला घेत आहेत. तसेच लवकरच आर्यन खानच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार आर्यन खानने एनडीपीएस कोर्टामध्ये आपला पासपोर्ट जमा केला होता. तसेच त्याला विशेष न्यायालयाच्या परवानगीविना त्याला देश सोडून जाण्याची परवानगी नाही आहे.
आर्यन खान १९ नोव्हेंबर रोजी एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला होता. या प्रकरणात आर्यन खानची ही तिसरी साप्ताहिक हजेरी होती. एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावल्यानंतर आर्यन खान दिल्लीतून आलेल्या एजन्सीच्या विशेष तपास पथकासमोरही हजर झाला होता. हे पथक आता या प्रकरणाचा तपास करत आहे. एनसीबीच्या विशेष तपास पथकाने या संदर्भात आतापर्यंत १२ हून अधिक जणांचा जबाब नोंदवला आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, तपास पथक तपासाची गती आणि दिशेबाबत समाधानी आहे.
दरम्यान, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे खंडणीसाठी अपहरण करण्याच्या कटामध्ये सहभागी होते, असा आरोप महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केला आहे. तसेच या सर्व कटकारस्थानाचे मास्टरमाईंड भाजपा नेते मोहित कंबोज हे होते, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता.