Aryan Khan Drug Case: "त्या क्रूझवर १० जणांना पकडलं, दोघांना सोडलं; त्यातला एक भाजपच्या बड्या नेत्याचा मेहुणा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:23 IST2021-10-08T13:23:33+5:302021-10-08T13:23:40+5:30
Aryan Khan Drug Case: ड्रग्ज पार्टी सुरू असलेल्या क्रूझवर भाजप नेत्याचा मेहुणा होता; नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा

Aryan Khan Drug Case: "त्या क्रूझवर १० जणांना पकडलं, दोघांना सोडलं; त्यातला एक भाजपच्या बड्या नेत्याचा मेहुणा"
मुंबई: क्रूझ बोटीवरील ड्रग्ज पार्टीवरून आता एनसीबी विरुद्ध एनसीपी असा संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या कारवाईत खरंच ड्रग्ज सापडलं का, एनसीबीच्या कारवाईत बाहेरील व्यक्तींचा समावेश का होता, भाजपचा नेता तिथे काय करत होता, अशी प्रश्नांची सरबत्ती मलिक यांनी केली आहे. त्यानंतर आता मलिक यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी ड्रग्ज पार्टीत किती जणांचा समावेश होता आणि किती जणांना अटक करण्यात आली, असे प्रश्न विचारले होते. क्रूझवरून ८ ते १० जणांना अटक करण्यात आल्याचं एनसीबीचे अधिकारी सांगतात. अटक किती जणांना झाली, आठ की दहा जणांना?, असा नेमका प्रश्न मलिक यांनी विचारला होता. आता मलिक यांनी त्यापुढे जाऊन खळबळजनक दावा केला आहे.
क्रूझवरील पार्टीत एकूण १० जण सापडले. पण कोर्टात ८ जणांना हजर करण्यात आलं. दोघांना सोडून देण्यात आलं. यातलं एक व्यक्ती भाजपच्या बड्या नेत्याशी संबंधित होती. भाजप नेत्याचा मेहुणा त्याच क्रूझवर होता. तोदेखील आरोपी होता. मात्र एनसीबीनं त्याला सोडून दिलं. याचे पुरावे, व्हिडीओ पत्रकार परिषद घेऊन देण्यात येतील, असं मलिक यांनी सांगितलं. एनसीबीनं भाजप नेत्याच्या मेहुण्याला का सोडलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एनसीबीच्या कारवाईबद्दल एनसीपीला संशय
क्रूझवर छापा टाकून एनसीबीनं आर्यन खानला अटक केली. यावेळी एका व्यक्तीनं त्याच्यासोबत फोटो काढला. त्या व्यक्तीचा आणि आर्यन खानचा एक सेल्फीदेखील व्हायरल झाला. मात्र तो आमचा अधिकारी नव्हताच, असं एनसीबीनं नंतर सांगितलं. मग हा व्यक्ती कोण होता? तो आर्यन खानसोबत काय करत होता? एनसीबीनं याची उत्तरं द्यायला हवीत, असं मलिक यांनी २ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत म्हटलं.
आर्यन खानसोबतच अरबाज मर्चंटलादेखील क्रूझवरून अटक करण्यात आली. त्याला एक जण पकडून एनसीबीच्या कार्यालयात नेत होता. ही व्यक्तीदेखील एनसीबीशी संबंधित नाही. तो भाजपचा उपाध्यक्ष मनीष भानुशाली आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत, असा दावा मलिक यांनी केला. त्यांनी भानुशालीचे फोटोदेखील पत्रकार परिषदेत दाखवले.
आणखी वाचा-
NCB चा साक्षीदार किरण गोसावी फरारी आरोपी; मुंबईसह ३ ठिकाणी गुन्हे दाखल
आर्यन खानला गांजा कोण पुरवत होतं? NCBनं कोर्टात नाव सांगितलं, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी