विमानतळावर भोपळ्यातून गांज्याची तस्करी करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 19:38 IST2018-07-01T19:37:14+5:302018-07-01T19:38:01+5:30
विशेष अन्वेषण विभागाने केली कारवाई, मुंबई एटीएसकडून मिळाली होती माहिती

विमानतळावर भोपळ्यातून गांज्याची तस्करी करणाऱ्यास अटक
मुंबई - मुंबई विमानतळावर एक प्रवासी अमली पदार्थाची तस्करी करणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कस्टम्स एअर इंटिलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी चलाखीने दोन भोपळ्यांतून गांज्याची तस्करी करणाऱ्या मोहम्मद सारवानला जेरबंद केले आहे.
मुंबई विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्स फ्लाईट क्रमांक ६ई १७०९ ने दोहा येथे मोहम्मद जाणार असल्याची खबर कस्टम्स एअर इंटिलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना एटीएसकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून बॅगेजमध्ये ठेवलेल्या दोन भोपळ्यांमधील ४१७८ ग्राम गांजा अधिकाऱ्यांनी नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रोपिक सबस्टेन्सेस एक्ट 1985 च्या तरतुदीअन्वये जप्त केले. मोहम्मदजवळ भारतीय पासपोर्ट आढळून आला असून पासपोर्ट क्रमांक आर ६०१५६९१ हा १२ ऑक्टोबर २०१७ ला जारी करण्यात आला असून ११ ऑक्टोबर २०२७ साली मुदत संपणार आहे. जप्त केलेला गांजा हा ऐकून ४ लाख १७ हजार ८०० रुपयांचा आहे. तसेच अटक आरोपी मोहम्मदचा जबाब एनडीपीएस ऍक्टच्या कलम ६७ नुसार नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास अधिकारी करीत आहेत.