'राज्य सरकार अन् पोलिसांनी अर्णब गोस्वामींचा शारीरिक छळ चालवलाय'

By महेश गलांडे | Published: November 8, 2020 05:49 PM2020-11-08T17:49:02+5:302020-11-08T17:49:59+5:30

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती.

Arnab Goswami physically abused by state government and police, Says Narayan rane | 'राज्य सरकार अन् पोलिसांनी अर्णब गोस्वामींचा शारीरिक छळ चालवलाय'

'राज्य सरकार अन् पोलिसांनी अर्णब गोस्वामींचा शारीरिक छळ चालवलाय'

Next
ठळक मुद्देरिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती.

मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. या घटनेनंतर भाजपा नेते आणि खासदार नारायण राणेंनी संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अर्णब यांचा शारीरिक छळ चालवल्याचा आरोप राणेंनी केला आहे.  

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. तिथून त्यांना रायगडमध्ये नेण्यात आले होते. तिथे न्यायालयात हजर केले असतान त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर, आज गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. यावरुन नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडून अर्णब यांचा छळ होत असल्याचा आरोप राणेंनी केला आहे. 

नारायण राणेंनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर बाण चालवले आहेत. 'अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका झाल्‍यास, त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल.', असे ट्विट नारायण राणेंनी केलंय. 

तळोजा कारागृहात मुक्काम

दरम्यानच्या काळात अर्णब गोस्वामी हे जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली होती. तर अधिक तपासासाठी रायगड पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या प्रकरणावरून न्यायालयीन लढाई सुरू असतानाच सुरक्षेच्या कारणावरून अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात नेण्याचा निर्णय़ पोलीस प्रशासनाने घेतला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोझ शेख आणि नितेश सारडा या या प्रकरणातील अन्य आरोपींनाही तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.

पोलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर ९ नाव्हेंबरला सुनावणी

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. या प्रकरणी आता सोमवारी, ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगड पोलिसांनी रायगडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतची सुनावणी शनिवारी पार पडली. सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि सुनावणीला सुरुवात झाली.
 

Web Title: Arnab Goswami physically abused by state government and police, Says Narayan rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.