Join us

Arnab Goswami: "अर्णब भाजपाचा कार्यकर्ता नाही; आम्ही पोपट बीपट पाळत नाही, ते पाळण्याचे काम तुम्हीच करता"

By मुकेश चव्हाण | Updated: November 4, 2020 18:42 IST

आम्ही खंबीर लोक आहोत, दुसऱ्याच्या जीवावर राजकारण करत नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षात जुंपली आहे. गोस्वामी यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोप भाजपाच्या अनेक नेत्यांनी केला. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. तर महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडूनही याला जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे.

अर्णब गोस्वामी भाजपचा सदस्य आहे का? त्याच्यासाठी गळा काढण्याचे कारण काय? महाराष्ट्रात मराठी महिलेवर अन्याय झाला तर तिच्याकडे पाहायचं नाही, आम्ही ते दाबून टाकलं तुम्ही पण दाबून टाकावं अस म्हणणं आहे का, असा सवाल राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजपाला विचारला होता. तसेच भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकला, भाजपाचा जीव त्याच्यात अडकला आहे का, असा टोलाही अनिल परब यांनी भाजपाला लगावला होता. मात्र आम्ही पोपट बीपट पाळत नाही, असं प्रत्युत्तर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ही ठोकशाही आहे. अर्णब गोस्वामीची सुटका होईपर्यंत आम्ही काळे पट्टे, जे जे काळे परिधान करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीजींनी अशा भ्रमात राहू नये की काही होत नाही. आणीबाणीनंतर पराभव झेलावा लागला होता, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी करुन दिली आहे. तसेच अर्णब गोस्वामी काही भाजपाचा कार्यकर्ता नाही, आम्ही पोपट बीपट पाळत नाही, ते पाळण्याचे काम तुम्हीच करता. आम्ही खंबीर लोक आहोत, दुसऱ्याच्या जीवावर राजकारण करत नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले अनिल परब?

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी अन्वय नाईक नावाच्या एका व्यवसायिकाचे पैसे बुडवले. त्यामुळे नाईक यांनी आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली. म्हणून गोस्वामींना अटक झाली आहे, असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडताहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच अर्णब गोस्वामींनी नाईक यांचे पैसे बुडवले. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक समस्येतून त्यांनी आत्महत्या केली.

एका मराठी भगिनीचं कुंकू गोस्वामींमुळे पुसलं गेलं. या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही. मग भाजप नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करताहेत? गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का?, असे प्रश्न परब यांनी विचारले आहेत. अन्वय नाईक यांनी गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या केली. भाजप नेते अशा गोस्वामींच्या बाजूनं आहेत का? असतील तर तसं त्यांनी जाहीर करावं, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले.

अर्णब गोस्वामींना अटक; रायगड पोलिसांची कारवाई

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज रायगड पोलिसांनी अटक केली आहे. पहाटे ५ वाजता मुंबई पोलिसांच्या सीआययु प्रमुख सचिन वाझे यांच्या पथकासह रायगड पोलीस त्यांच्या वरळी येथील घरी गेले होते. दीड तास पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर सात वाजता गोस्वामींना अटक केली. आधी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत अर्णब गोस्वामींना अलिबाग कोर्टात हजर केले.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक याने ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्वेय नाईक यांच्या मृतदेहाशेजारीच त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. अन्वेय मधुकर नाईक (५३) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या केली होती. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले. अन्वेय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली होती.

टॅग्स :अर्णब गोस्वामीभाजपाचंद्रकांत पाटीलमहाराष्ट्र सरकारअन्वय नाईकपोलिस