शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणावरून विधानसभेत जितेंद्र आव्हाड-शंभुराज देसाई यांच्यात जुगलबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 13:04 IST2023-03-14T13:03:17+5:302023-03-14T13:04:08+5:30
पोलीस यंत्रणा या प्रकरणावर तपास करत आहे. पोलीस पोलिसांचे काम करतायेत. तपासात सगळ्या बाबी समोर येतील असं मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.

शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणावरून विधानसभेत जितेंद्र आव्हाड-शंभुराज देसाई यांच्यात जुगलबंदी
मुंबई - शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी राज्यात वादंग निर्माण झाले आहे. या व्हायरल व्हिडिओचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहेत. त्यावर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात जुगलबंदी झाली. या प्रकरणात १४ मुलांना अटक केलीय. तो व्हिडिओ खरा की खोटा हे समोर येऊ द्या. रात्री २-२ वाजता पोलीस पोरांना उचलतायेत असा दावा जितेंद्र आव्हाडांनी सभेत केला.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्या पोरांची चुकी काय हे तरी कळू द्या. मुख्यमंत्री संवेदनशील होऊन या प्रकरणात उत्तर द्यावे. तरूण पोराचं आयुष्य यात बर्बाद होतंय असा सवाल त्यांनी विचारला. त्यावर शीतल म्हात्रे, राज प्रकाश सुर्वे यांच्याकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली. शीतल म्हात्रे या माध्यमांसमोर रडत होत्या. एखाद्या महिलेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. कुठल्याही स्त्री मनाला हे सहन होणार नाही. रात्री २ वाजता उचलले पण हा तपासाचा भाग आहे. परंतु हे करताना काही वाटलं नाही का? असं सांगत शंभुराज देसाईंनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिले.
त्याचसोबत पोलीस यंत्रणा या प्रकरणावर तपास करत आहे. पोलीस पोलिसांचे काम करतायेत. तपासात सगळ्या बाबी समोर येतील. तपासानंतर सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर या प्रकरणात दोषी पोलीस शोधतील. तोपर्यंत पोलिसांना त्यांचे काम करू द्या असंही मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं. तर शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
आमदाराच्या मुलाने हा फेसबुक व्हिडिओ डिलीट का केला? हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा आहे हे पोलीस तपासात येईलच. व्हिडिओ ओरिजनल असेल तर त्या आमदारांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. सरकार गुन्हेगाराच्या बाजूने आहे की काय अशी स्थिती सध्या राज्यात निर्माण झालीय असा घणाघात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते दानवे यांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेवर केला.