तुम्ही टॅक्सीने प्रवास करताय? ब्ल्यू अल्ट्रा लाइटपासून सावधान! प्रवाशांची फसवणूक; टॅक्सी चालक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 16:22 IST2026-01-29T13:12:10+5:302026-01-31T16:22:03+5:30
Mumbai Taxi Fraud: रेल्वे स्थानक परिसरात घाई गडबडीत असलेल्या प्रवाशांना ब्ल्यू अल्ट्रा लाइटचा वापर करत टॅक्सीचालकांच्या टोळीकडून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत.

तुम्ही टॅक्सीने प्रवास करताय? ब्ल्यू अल्ट्रा लाइटपासून सावधान! प्रवाशांची फसवणूक; टॅक्सी चालक ताब्यात
Mumbai Taxi Scam: रेल्वे स्थानक परिसरात घाई गडबडीत असलेल्या प्रवाशांना ब्ल्यू अल्ट्रा लाइटचा वापर करत टॅक्सीचालकांच्या टोळीकडून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर माटुंगा पोलिसांनी सापळा रचून टॅक्सीचालक सलीम अब्दुल अजीज (४०) याला २६ जानेवारीला ताब्यात घेत दोघांवर बुधवारी गुन्हा नोंदवला. त्यामुळे प्रवाशांनी या भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दादर पूर्वेला रेल्वे स्टेशन परिसरात बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांना अनेक टॅक्सीचालक लुटत असल्याच्या तक्रारी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या विविध सोशल मीडिया हँडल तसेच पोर्टलवर आल्याचे पोलिसांनी सांगितले. टॅक्सीचालकांसोबत अन्य खासगी व्यक्तींचे साटेलोटे आहे. दादर स्थानकावर पहाटे तीन ते चार वाजता प्रवासी उतरतात. बऱ्याचदा ते झोपेत तसेच घाईत असतात. त्याचा फायदा घेत खासगी व्यक्ती त्यांना गोड बोलून त्यांच्या जोडीदार चालकाकडे घेऊन येतात. तो नंतर अल्ट्रा ब्ल्यू लाइटचा वापर करत ५०० रुपयांची नोट उलटी करत ती नोट १०० ची असल्याचे भासवत लुटतात.
सीटखाली टाकले पैसे
दहिसर पोलिसांच्या हद्दीत राजेश कमानीना यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये टॅक्सीमध्ये लुटण्यात आले. चालकाने त्यांच्याकडून पंधराशे रुपये घेतले ते सीटच्या खाली फेकले आणि त्यानंतर त्यांच्या ५०० रुपयांच्या तीन नोटा १०० च्या दिल्याचे भासवले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलीस कारवाई कशी करणार?
आरोपींच्या हातचलाखीमुळे आपली फसवणूक झालीय हेच अनेकदा प्रवाशांना कळत नाही. त्यांना पुढच्या प्रवासाला निघायचे असल्याने ते घाईत असतात. त्यामुळे हजार, दोन हजार रुपये गेले तरी ते फारसा विचार न करता तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे पोलीस कारवाई होत नाही.
माटुंग्यात रंगेहाथ सापडला टॅक्सी चालक
- शाश्वती मुझुमदार (५७, रा. पश्चिम बंगाल) या शिर्डीहून वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करून दादर येथे उतरल्या. त्या पूर्वेकडील शुभम हॉटेलजवळ आल्या. त्यापुढे विमानाने कोलकाता येथे जाणार होत्या.
- टॅक्सीचालक सलीम अब्दुल अजीज याने पैसे सुट्टे करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या दोन नोटा घेत त्या १०० रुपयांच्या असल्याचे भासवून दोन हजारांची फसवणूक केल्याची कबुली दिली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे शिपाई सुधीर सोनवलकर यांनी माटुंगा पोलिसांत तक्रार केली.