पाणी पिताय ना? तापमानवाढीमुळे ‘हीट स्ट्रोक’चा धोका; काळजी घ्या अन् धोका टाळा, तज्ज्ञांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:09 IST2026-03-08T13:08:57+5:302026-03-08T13:09:11+5:30
मुंबईसारख्या किनारी शहरांमध्ये आर्द्रता अधिक असल्याने उष्णतेचा परिणाम अधिक तीव्र जाणवू शकतो.

पाणी पिताय ना? तापमानवाढीमुळे ‘हीट स्ट्रोक’चा धोका; काळजी घ्या अन् धोका टाळा, तज्ज्ञांचा सल्ला
मुंबई : गेले काही दिवस तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. अशा वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे शरीर थंडावण्याची नैसर्गिक प्रक्रिया मंदावते आणि ‘हीट स्ट्रोक’चा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे योग्य काळजी घेऊन धोका टाळता येऊ शकतो, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
मुंबईसारख्या किनारी शहरांमध्ये आर्द्रता अधिक असल्याने उष्णतेचा परिणाम अधिक तीव्र जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती घेणे, पाणी व द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. वाढत्या तापमानासोबत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास शरीराला स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण होते. वाढत्या आर्द्रतेमुळे खूप घाम येतो आणि शरीर थंड होण्याची प्रक्रिया मंदावते. अशा परिस्थितीत शरीराचे तापमान वाढून हीट स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो.
लहान मुले, वयोवृद्ध, गर्भवती महिला, तसेच हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. बाहेर जाताना हलके, सैल, सुती कपडे घाला. डोक्यावर टोपी, स्कार्फ बांधा, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
डोकेदुखी आणि चक्कर येणे, मळमळ, तीव्र थकवा, अत्याधिक घाम येणे, त्वचा गरम व कोरडी होणे ही हीट स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. याशिवाय स्नायूंमध्ये पेटके येणे, कमकुवतपणा जाणवणे, नाडी वेगाने धडधडणे, गोंधळ येणे, चिडचिड होणे, बेशुद्ध होणे असे प्रकार देखील घडू शकतात, ही लक्षणे दिसल्यास त्वरित विश्रांती घ्यावी आणि पाणी किंवा द्रवपदार्थांचे आहारातील सेवन वाढवावे. लक्षणे गंभीर वाटल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.
शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये, यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. नारळपाणी, ताक, लिंबूपाणी यांसारखे नैसर्गिक द्रवपदार्थ आहारात समाविष्ट केल्यास शरीराला थंडावा मिळतो. उष्णतेचा परिणाम कमी होण्यास मदत होते. हवामानातील बदल आणि वाढती आर्द्रता लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे, उन्हापासून बचाव करणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे अत्यावश्यक आहे.
डॉ. निमित्त नागडा, इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ