अर्चना कुटे यांना ईडीकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:50 IST2026-03-07T04:50:43+5:302026-03-07T04:50:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ज्ञानराधा मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सुरेश कुटे ...

अर्चना कुटे यांना ईडीकडून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्ञानराधा मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सुरेश कुटे याला काही महिन्यांपूर्वी अटक केल्यानंतर आता अर्चना कुटे यांनादेखील ईडीने अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.
सोसायटीने १२ ते १४ टक्के व्याजदराने परतावा देणाऱ्या अनेक ठेव योजना सादर केल्या. सोसायटीने सोने, वैयक्तिक कर्ज, मुदत ठेवींवर कर्ज अशा कर्ज योजनादेखील सादर केल्या. सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली सोसायटीचे काम होत होते. त्यांंनी किमान चार लाख गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले.
ईडीचा ठपका काय आहे?
काही ठराविक गुंतवणूकदारांना सुरुवातीला कुटे यांनी परतावा दिला होता. मात्र, त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांना एक रुपयाही परत मिळाला नाही. कुटे यांनी २४६७ कोटी रुपयांचा अपहार करत ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळविल्याचा ठपकादेखील ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे.
हे पैसे नंतर रोखीने काढून घेत त्याद्वारे वैयक्तिक मालमत्तांची खरेदी त्यांनी केल्याचेही तपासात दिसून आले आहे. याप्रकरणी राज्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले होते.
मात्र, या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीनेदेखील याचा तपास सुरू केला होता. दरम्यान, आतापर्यंत सोसायटीची एकूण १६२१ कोटी ८९ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.