Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप-दंड, न्यायालयाकडून तपासाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 14:47 IST

सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी कुरेशी याला मरेपर्यंत जन्मठेप व ५० हजार रुपये दंड ही शिक्षा सुनावली आहे

मुंबई : ट्रॅफिक पोलीस हवालदार शहीद विलास शिंदे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अहमद अली मोहम्मद अली कुरेशी याला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाच्या स्वरूपात भरण्याची शिक्षा सत्र न्यायालयाने आज सुनावली आहे. शुक्रवारी त्याच्यावरील आरोप सिद्ध करवीण्यात खार पोलिसांना यश मिळाले होते. सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी कुरेशी याला मरेपर्यंत जन्मठेप व ५० हजार रुपये दंड ही शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास व दंड भरल्यास त्यातील ४५ हजार रुपये शिंदे यांच्या पत्नी साधना शिंदे यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तत्कालीन खार पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे जे सध्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत त्यांचे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या तपासाबाबत न्यायालयाने त्यांची पाठ थोपाटली आहे. नमूद खटल्यामध्ये तपास अधिकारी काणे यांच्यासह सध्या नेमणूक कोर्ट कारकून विद्या कन्हयाळकर, हेमंत कांबळे ,गणेश अहिर, राहुल पवार व विशेष सरकारी अभियोक्ता वैभव बागडे यांनी शिंदेना न्याय मिळवुन देण्यात विशेष प्रयत्न केले. काय होते नेमके प्रकरण?खार पश्चिमच्या मॅक्लॉइड पेट्रोल पंप, एस व्ही रोड परिसरात २३ ऑगस्ट, २०१६ रोजी अली याचा लहान अल्पवयीन भाऊ हेल्मेट न घालताच मोटरसायकल चालवत होता. त्यावेळी त्या मार्गावर कर्तव्यावर असलेल्या शिंदे यांनी त्याला हटकले आणि त्याच्याकडे कागदपत्राची मागणी केली. मात्र ते त्याच्याकडे नव्हती, त्यामुळे गाडी तिथेच सोडून त्याला पालकांना बोलावण्यास सांगण्यात आले. तेव्हा त्याच्या मागे बसलेला त्याचा मोठा भाऊ अली याने शिंदेसोबत हुज्जत घालत बांबूने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात गंभीररित्या जखमी झालेल्या शिंदेचा ३१ ऑगस्ट, २०१६ रोजी मृत्यू झाला. त्यानुसार अली आणि त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 

टॅग्स :न्यायालयपोलिसगुन्हेगारी