काहीही झाले तरी शनिवारी ब्लॅकआउट नाही , ट्रायची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 07:06 IST2018-12-26T07:05:32+5:302018-12-26T07:06:15+5:30
दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) नवीन नियम ग्राहकांसाठी अत्यंत चांगला असून या निर्णयाची अंमलबजावणी करणे सर्वांसाठी लाभदायक आहे.

काहीही झाले तरी शनिवारी ब्लॅकआउट नाही , ट्रायची ग्वाही
मुंबई : दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) नवीन नियम ग्राहकांसाठी अत्यंत चांगला असून या निर्णयाची अंमलबजावणी करणे सर्वांसाठी लाभदायक आहे. या निर्णयाची अंंमलबजावणी करण्यासाठी आम्ही योग्य ती उपाययोजना केली असून काहीही झाले तरी २९ डिसेंबरला ब्लॅकआउट होणार नाही, अशी ग्वाही ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिली.
केबल ग्राहकांनी पसंतीच्या वाहिन्यांची यादी केबल व्यावसायिकांना देण्याची गरज आहे. ग्राहकांमध्ये अद्याप पुरेशा प्रमाणात जनजागृती झालेली नसल्याने ब्लॅकआउट होण्याची भीती केबल व्यावसायिकांनी वर्तवली होती. वाहिन्यांनी ला कार्टे पद्धतीने आपले दर जाहीर केले आहेत. मात्र ज्या ग्राहकांना अधिकाधिक बुके पद्धतीने वाहिन्या पाहायच्या असतील त्यांना साहजिकच जास्त शुल्क द्यावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
साधारणत: कोणताही ग्राहक २० ते २५ वाहिन्या पाहतो. मात्र, सध्या केबल व्यावसायिकांकडून दरमहा ४०० ते ४५० रुपये शुल्क आकारले जाते. नवीन नियमांनुसार आता ग्राहक यापेक्षा कमी शुल्क देऊन आपल्या आवडीच्या मर्यादित वाहिन्या पाहू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्राहक आवडीनुसार वाहिन्यांची निवड करू लागल्यावर वाहिन्या दर कमी करून त्यांना आपल्याकडे आकर्षित करू शकतात, अशी शक्यता शर्मा यांनी वर्तवली. सध्या पाहत नसलेल्या अनेक वाहिन्यांसाठी ग्राहकांना शुल्क भरावे लागते. हा प्रकार यापुढे बंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ट्रायच्या नियमावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या निर्णयातून ग्राहकांना सर्वांत जास्त महत्त्व दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अशी करता येणार वाहिन्यांची निवड
ट्रायने ग्राहकांना वाहिन्यांची निवड करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. बेसिक सर्व्हिस टिअर (बीएसटी) यामध्ये केवळ फ्री टु एअर वाहिन्या पाहता येतील. यामध्ये एकूण १०० वाहिन्या दिसतील. यात दूरदर्शनच्या २६ वाहिन्या दाखवणे बंधनकारक आहे. याशिवाय मनोरंजन वाहिन्या, चित्रपट, लहान मुलांच्या वाहिन्या, संगीत, क्रीडा, बातम्यांच्या वाहिन्या, धार्मिक वाहिन्या, माहिती पुरवणाऱ्या वाहिन्या अशा वाहिन्या दाखवणे बंधनकारक आहे.
बीएसटी पॅकेज व अ ला कार्टे (स्वतंत्र) वाहिन्या, बीएसटी व अ ला कार्टे (स्वतंत्र) वाहिन्या व ब्रॉडकास्टर्सने दिलेल्या बुके मधील वाहिन्या,
बीएसटी व अ ला कार्टे (स्वतंत्र) वाहिन्या व एमएसओ ने दिलेल्या बुके मधील वाहिन्या अशा तीन प्रकारे ग्राहकांना वाहिन्यांची निवड करता येईल.