Join us  

शिक्षणासाठी कायपण... मराठमोळ्या स्वप्नालीच्या मदतीसाठी सोनू सूद सरसावला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 8:59 AM

मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारी स्वप्नाली सुतार नेटवर्कची समस्या असतानाही ऑनलाईन शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून आहे.

मुंबई - एक ट्विट करा अन् तुमची अडचण सोडवा, असंच काहीही सोनू सुदकडून होणाऱ्या मदत कार्याच्या बाबतीत घडत असल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपूर्वी वॉरियर आजीला मदत करण्याचं आश्वास सोनूने दिलं होत. नुकतंच, या आजीसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलंय. अभिनेता सोनू सूद आता सिंधुदुर्गच्या स्वप्नालीलाही मदत करण्यासाठी सरसावला आहे. कोरोनामुळे ऑनलाईन क्लासला हजेरी लावण्यासाठी स्वप्नालीची जिद्द आणि तमळळ पाहून सोनुने मदत करण्यासाठी तिचे डिटेल्स मागवले आहेत.

कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे शाळा सुरू आहेत. मात्र, दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणामुळे प्रचंड नुकसान होत आहे. काही ठिकाणी शिकण्याची इच्छाशक्ती असली तर मार्ग निघतोच याची प्रचितीही येताना दिसते. याचेच उत्तम उदाहरण कोकणातील एका दुर्गम भागातून लोकांच्या समोर आलं आहे.

मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारी स्वप्नाली सुतार नेटवर्कची समस्या असतानाही ऑनलाईन शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून आहे. कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावात इंटरनेटचा अभाव असल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचण येत होती, कॉलेजचे ऑनलाईन लेक्चरही बुडत होते. त्यामुळे स्वप्नालीने गावातील एका डोंगरावर जाऊन अभ्यास करण्याचं निश्चित केले. भरपावसात फक्त एका झोपडीच्या आडोशाला ती कॉलेजच्या ऑनलाईन क्लासला हजेरी लावते. कोरोनाच्या सुरुवातीला कॉलेज बंद झाल्याने स्वप्नाली तिच्या गावी आली. त्यानंतर परिस्थिती गंभीर होत गेली. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. हे लॉकडाऊन वाढतच गेले. त्यानंतर शिक्षण ऑनलाईन सुरु करण्याची तयारी झाली. मात्र गावाकडे असल्याने घरात रेंज मिळत नव्हती. त्यामुळे डोंगरावर जाऊन नेटवर्क मिळतेय का पाहिलं. त्याठिकाणी नेटवर्क मिळालं पण त्याठिकाणी उन्हपावसाळ्यात अभ्यास कसा करायचा हा विचार मनात आला. सोनालीच्या या जिद्दीची कहाणी डॉ. किरण डेरले यांनी शेअर करुन सोनू सूदकडे मदतीची मागणी केली होती. सोनूने या ट्विटला रिप्लाय देत, स्वप्नालीचे डिटेल्स मागवले आहेत. तसेच, तिच्या गावात Wi-fi पोहोचविण्याचं आश्वासनही सोनूनं दिलंय. सोनूकडून मिळाणाऱ्या मदतीच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, सोनू न थकता, दररोज गरजूंना मदत करताना दिसून येतो.

ऑनलाईन शिक्षणासाठी स्वप्नालीचा संघर्ष; भरपावसात डोंगरावरील छोट्या झोपडीत करतेय अभ्यास

सोनाली म्हणते....

सुरुवातीच्या दिवसात १५-२० दिवस मी पावसात छत्री पकडून उभी राहून लेक्चर अटेंड केले. त्यानंतर घरातल्यांनीही पाठिंबा दिला. माझ्या भावांनी डोंगरावर एक छोटीशी झोपडी तयार केली. त्याच झोपडीत मी अभ्यासाला सुरुवात केली. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अभ्यास करते, ९ ते १२.३० वाजेपर्यंत लेक्चर अटेंड करते. त्यानंतर १.३० ते ६ मध्ये प्रॅक्टिकल होते. साडेसहा वाजता सर्व आटपून घरी परतते. स्वप्नालीचा हा दिनक्रम रोजचा झालेला आहे.  स्वप्नालीला मदतीची गरज नाही. पण तिला मुंबई हॉस्टेलसाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. ती दिव्याला राहते आणि तिचं कॉलेज गोरेगाव येथे आहे. प्रवासामध्ये तिचे येऊन-जाऊन ५ तास जातात. हॉस्टेलची फी ५० हजार आहे. पण ती आवाक्याबाहेर असल्याने दिव्याला राहायला लागतं. यासंदर्भात स्थानिक आमदार नितेश राणेंनी तिच्या हॉस्टेलची अडचण सोडवू असं आश्वासन दिलं होतं.

दुर्गम भागात नेटवर्कची समस्या

देशभरात तसेच राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनामुळे अनेकांचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं आहे. अशातच कोरोनाचा सगळ्यात जास्त परिणाम हा शिक्षण व्यवस्थेवर होताना दिसत आहे. गेल्या ५ महिन्यापासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमुळे शाळा-कॉलेज बंद आहेत. कोरोनाची परिस्थिती कधी बदलेल, शाळा पुन्हा कधी सुरु होतील याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाही. कोरोनाच्या संकटात शाळांनीही आपली व्यवस्था बदलत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. परंतु सर्वच भागात ही ऑनलाईन सुविधेने अभ्यास करणे सोप्प आहे का? हा खरा प्रश्न आहे. ज्याठिकाणी मोबाईललाही नेटवर्क मिळत नाही अशा भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध असणे कठीणच आहे. त्यामुळे अशा दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणामुळे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र काही ठिकाणी शिकण्याची इच्छाशक्ती असली तर मार्ग निघतोच याची प्रचितीही येताना दिसते. याचेच उत्तम उदाहरण कोकणातील एका दुर्गम भागातून लोकांच्या समोर आलं आहे. 

टॅग्स :सिंधुदुर्गशिक्षणसोनू सूदशिक्षण क्षेत्र