मुंबईत तरुणीकडे पाहून हस्तमैथुन, भुयारी मार्गातील भयानक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 18:48 IST2018-02-28T18:38:27+5:302018-02-28T18:48:56+5:30
मुंबईत पुन्हा एकदा एका विकृताने महाविद्यालयीन तरुणीला पाहून हस्तमैथुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबईत तरुणीकडे पाहून हस्तमैथुन, भुयारी मार्गातील भयानक प्रकार
मुंबई - मुंबईत पुन्हा एकदा एका विकृताने महाविद्यालयीन तरुणीला पाहून हस्तमैथुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेट्रो सिनेमाजवळच्या भुयारी मार्गामध्ये हा प्रकार घडला. संबंधित तरुणी दक्षिण मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. 16 फेब्रुवारीच्या संध्याकाळी ही घटना घडली. तरुणी भुयारी मार्गाच्या पायऱ्या उतरत असताना एक व्यक्ति या तरुणीच्या दिशेने आला व त्याने तिची छेड काढली.
त्यानंतर त्याने तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने तिथून पळ काढला. त्यावेळी तिथे सुरक्षारक्षकही होते. पण त्यांनी तरुणीला काय झालंय? का पळतेस? हे विचारण्याचीही तसदी घेतली नाही. अनेक महिला खासकरुन महाविद्यालयीन तरुणी दक्षिण मुंबईतील या भुयारी मार्गाचा वापर करतात. त्यांनी अनेकदा या भुयारी मार्गातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
येथे सुरक्षा रक्षक आहेत. सीसीटीव्हीसुद्धा लावण्यात आले आहेत तरीही ही घटना घडली. मागच्याच आठवडयात अभिनेते सुमीत राघवन यांची पत्नी चिन्मयी सुमीत यांना असाच धक्कादायक अनुभव आला होता. चिन्मयी सुमीत विलेपार्लेजवळच्या पार्लेटिळक शाळेजवळ होत्या. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारमधील चालकाने चिन्मयी यांच्या समोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. सुमीत राघवन यांनी पोलिसांकडे यासंबंधी तक्रार केल्यानंतर काही तासांमध्येच संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.