महादेव अॅपची आणखी १३० कोटींची मालमत्ता जप्त; आजपर्यंत ११ जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 05:58 IST2024-12-15T05:57:47+5:302024-12-15T05:58:16+5:30
याच प्रकरणात बॉलीवूडमधील काही कलावंतदेखील गुंतले असून त्यांचे जबाबही ईडीने यापूर्वी नोंदवले आहेत.

महादेव अॅपची आणखी १३० कोटींची मालमत्ता जप्त; आजपर्यंत ११ जण अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मोबाइल अॅपच्या माध्यमातून बेटिंगचा अवैध उद्योग करत पाच हजार कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात नेणाऱ्या महादेव अॅप कंपनीला शनिवारी ईडीने पुन्हा दणका देत १३० कोटी ५७ लाखांची मालमत्ता जप्त केली. त्यात कंपनीने गुंतवणूक केलेले रोखे, बॉण्ड, डिमॅट खात्यातील रक्कम आदींचा समावेश आहे. ७ डिसेंबरलाही ईडीने ३८८ कोटी ९९ लाखांची मालमत्ता जप्त केली होती.
आतापर्यंत ईडीने कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांची एकूण २ हजार ४२६ कोटी १८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात १९ कोटी ३६ लाखांची रोकड, १६ कोटी ६८ लाखांच्या मौल्यवान वस्तू आणि १७२९ कोटी १७ लाख रुपयांच्या १११ स्थावर मालमत्ता आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत ११ जण अटकेत
या प्रकरणी आतापर्यंत एकूण ११ जणांना ईडीने अटक केली आहे. तसेच, याच प्रकरणात बॉलीवूडमधील काही कलावंतदेखील गुंतले असून त्यांचे जबाबही ईडीने यापूर्वी नोंदवले आहेत.