प्राण्यांनाही होतो कॅन्सर, काय आहेत लक्षणे, होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:29 IST2025-02-08T13:26:51+5:302025-02-08T13:29:07+5:30
Animal Cancer: घरातील पाळीव प्राण्यांनाही कर्करोग होतो. तो कसा होतो आणि तो होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दल वाचा...

प्राण्यांनाही होतो कॅन्सर, काय आहेत लक्षणे, होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची?
Pet Animal Cancer Symptoms & Precautions: घरात पाळीव प्राणी ठेवताना त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः त्यांना कशामुळे कोणते आजार होऊ शकतात? कोणत्या आजारांचा संसर्ग होऊ शकतो? पाळीव प्राण्यांनाही कर्करोगासारखा दुर्धर आजार होऊ शकतो, याबद्दल अनेकांना कल्पना नाहीये. पण, पाळीव प्राण्यांना हा आजार होतो. त्याची कारणे काय असतात आणि लक्षणे कोणती दिसतात, हे समजून घ्या.
कॅन्सरचे प्रकार
आस्ट्रीयो, सार्कोमा, कार्सिनोमा, लिम्फोमा, मॅलेनोमा, लायपोमा हे कॅन्सरचे प्रकार प्राण्यांमध्ये आढळतात. मांजरांमध्ये फेलाईन ल्युकेमिया व्हायरस हा कॅन्सरशी संबंधित आहे. मॅलिग्नंट प्रकारातील कॅन्सरच्या पेशी शरीरात वेगाने वाढतात, त्यामुळे गाठी निर्माण होतात.
जनावरांमध्ये कॅन्सर होण्याची कारणे
प्रदीर्घ वेळ उन्हात राहणे
धूम्रपान क्षेत्रात (स्मोकिंग झोन) प्राण्यांचा वावर
कीटकनाशक व केमिकलचा प्रभाव
हालचाली कमी असणे
डबाबंद अथवा दूषित अन्न सेवन
यामुळे जिभेखाली, जबड्यात, स्तनांमध्ये, शौचाच्या जागी, जननेंद्रियांमध्ये, लिव्हर, किडनी, अन्ननलिका या अवयवांमध्ये कर्करोग होतो.
जनावरांना कर्करोग झाल्याची प्रमुख लक्षणे
वजन कमी होणे
भूक मंदावणे किंवा खाणे-पिणे बंद होणे
नाक, तोंड किंवा शौचाच्या जागेतून रक्त पडणे
श्वास घेण्यास व चावण्यास त्रास होणे
उलटीमध्ये रक्त पडणे
तीव्र वेदना होणे
दुर्लक्ष टाळा, तत्काळ उपचार घ्या
प्राण्यांमध्ये या लक्षणांची सुरुवात होताच त्वरित काळजी घेणे गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर बनतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे पशुचिकित्सकांकडे जाऊन वेळेत उपचार करणे महत्त्वाचे आहे.
जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?
सकाळ-संध्याकाळ फिरवताना प्राण्यांना मास्क लावणे
पौष्टिक आणि सकस आहार देणे
वजनावर नियमित लक्ष ठेवणे
श्वान किंवा अन्य प्राणी विकत घेताना त्यांच्या वैद्यकीय इतिहासाची चौकशी करणे
अनुवंशिक आजारांची माहिती घेणे
जनावरांमध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी त्यांचा आहार सकस ठेवा. उद्भवणाऱ्या कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच जवळच्या पशुवैद्याकडे उपचार घ्या. - डॉ. अर्जुन यादगीर, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग